‘झिम्मा २’ चित्रपटाने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकही या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका पाहणं रंजक ठरत आहे. (Siddharth Chandekar On Jhimma 2 Starcast)
चित्रपटात सात बायकांच्या सात तऱ्हा दाखवण्यात आल्या आहेत. समस्त महिलावर्गाला प्रेरित करणारा हा सिनेमा साऱ्यांच्या मनावर राज्य करत आहे. चित्रपटात या कलाकारांनी अक्षरशः धुडगूस घातलेला पाहायला मिळत आहे. शिवाय चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही हे कलाकार विशेष मेहनत घेत आहेत. प्रमोशनमध्येही ही कलाकार मंडळी धमाल मस्ती करताना दिसत आहेत. चित्रपटात प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका उत्तमरीत्या वठवली आहे.
या सात बायकांना एकट्या कलाकाराने सांभाळलेलं पाहायला मिळत आहे. तो कलाकार म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरची महत्त्वपूर्ण भूमिका असून या सात महिला कलाकारांसह त्यांची तारेवरची कसरत पाहायला मिळत आहे. या सात महिला कलाकारांच्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी सिद्धार्थने एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थने चित्रपटातील सात अभिनेत्रींचे हसतानाचे खास फोटो शेअर केले आहेत.
या पोस्टखाली कॅप्शन देत त्याने लिहिलं आहे की, “काय कमाल आहे ना बायकांची. एवढं हसायला व हसवायला शिकतात कुठून? मनापासून प्रेम करायला, मनापासून काळजी घ्यायला, मनापासून जगायला ते ‘मन’ किती शक्तिशाली असेल याची कल्पना करणं सुद्धा अवघडचं. संकटाच्या, दुःखाच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे हसून बघायला काय ताकद लागत असेल. आणि एवढं असून सुद्धा लहान बाळासारखं हट्ट करायला पण मागे पुढे बघत नाहीत. अजब आहात तुम्ही. खरंच काय कमाल आहे ना बायकांची. यांचं सौंदर्य एका फोटोत कधीच दाखवता यायचं नाही. हास्य दाखवण्याचा हा माझा बारीक प्रयत्न” असं म्हणत त्याने सातही अभिनेत्रीचं भरभरून कौतुक केलं आहे.