बॉलीवूडचे प्रसिद्ध संवाद लेखक, गीतकार, कवी जावेद अख्तर प्रत्येक मुद्द्यावर आपले स्पष्टपणे मत मांडण्यात अग्रस्थानी असतात. अशातच जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. नुकतेच जावेद अख्तर यांनी स्वत:ला नास्तिक असल्याचे म्हणत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. “मी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही, प्रत्येक सण स्वतःचा मानून साजरा करतो”, असं म्हणत जावेद अख्तर यांनी एका पॉडकास्टमध्ये मुस्लिम व हिंदू धर्मावर खुलेपणाने भाष्य केले आहे. (Javed Akhtar on Religion)
हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर धर्मांबाबत जावेद अख्तर यांनी भाष्य करत म्हटले आहे की, “मी भारतीय आहे आणि प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे, हे भारतीयांचे सौंदर्य आहे”. जावेद अख्तर यांनी एका खासगी यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टमध्ये धर्माबाबत मांडलेलं मत चर्चेत आलं आहे. लहानपणापासून तुम्ही मुस्लीम कुटुंबात राहता, इस्लामबाबत तुमचे काय विचार आहेत, असा प्रश्न त्यांना विचारला असता यावर जावेद अख्तर म्हणाले, “माझा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला आहे. माझे पालनपोषणही त्याच पद्धतीने झाले, माझे शिक्षण प्रत्येक मुस्लिमाप्रमाणे सुरु झाले, पण किशोरवयीन झाल्यानंतर मी नास्तिक मुस्लिम बनलो. कारण माझा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला आहे, मी त्याचे पालन करत आहे, आणि म्हणूनच मी हिंदू होऊ शकत नाही”.
जावेद अख्तर यांना जेव्हा विचारण्यात आले की, “त्यांना सोशल मीडियावर ‘जिहादी’ म्हटले जाते आणि वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल केले जाते, त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय आहे?”, यावर जावेद अख्तर म्हणाले, “जेव्हा लोक मला माझ्या धर्माबद्दल ट्रोल करतात तेव्हा मी हसतो. अनेक लोक मला जिहादी म्हणतात, तर अनेकजण म्हणतात की, मी पाकिस्तानात जावे. पण मी त्या गोष्टी गमतीत घेतो”.
जेव्हा जावेद अख्तर यांना असं विचारण्यात आलं की ते धर्म नीट का पाळत नाहीत. यावर जावेद अख्तर म्हणाले की, “माझे पालन-पोषण मुस्लिम कुटुंबात झाले आहे. माझे आजोबा आणि वडील सगळे नमाजी होते पण मी होऊ शकलो नाही. मलाही ईद आणि इतर सण साजरे करायला आवडतात”. जावेद पुढे म्हणाले, “मला वाटतं की समाजाच्या दबावाखाली धर्म पाळला जातो आणि दबावाखाली पाळली जाणारी कोणतीही गोष्ट ओझं आहे, मला त्यात राहायचं नाही. माझी पत्नी शबाना आणि मी सुद्धा ईद साजरी करतो, आम्ही होळी, दिवाळी किंवा ख्रिसमसही साजरा करतो. शबाना माझ्या विचाराला पाठिंबा देतात, यासाठी मी त्यांचा आभारी आहे”.