Aruna Irani Talks about Relationship : बॉलिवूडमधील एक लोकप्रिय चेहरा असलेल्या अभिनेत्री अरुणा इराणी सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीत काम करणं त्यांना महागात पडलं, असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. याच मुलाखतीत अरुणा इराणी यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा करत लग्न आणि रिलेशनशिप्सबाबत स्पष्ट मत मांडलं आहे. सिनेसृष्टीत अरुणा इराणी आणि दिवंगत अभिनेते मेहमूद यांच्या नात्याबाबत अनेक वर्षं चर्चा रंगत होत्या.
नुकत्याच एका मुलाखतीत अरुणा इराणी यांनी मेहमूद यांच्यासोबतच्या नातेसंबंधांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, “मेहमूद यांनी माझं करिअर घडवलं, पण त्यांच्यामुळेच माझं करिअर उध्वस्तही झालं.” या वक्तव्यासह त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही वैयक्तिक आणि संवेदनशील बाबी उघड केल्या आहेत. अरुणा इराणी अगदी नवव्या वर्षी सिनेसृष्टीत आल्या होत्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. त्या काळात घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे लहान वयातच काम करणं त्यांना गरजेचं होतं. अशा परिस्थितीत मेहमूद यांनी अरुणा इराणी यांना अभिनय क्षेत्रात मोठी संधी दिली. त्यामुळे त्यांनी दिलेली ही संधी अरुणा इराणी यांच्यासाठी फार मोलाची ठरली.
आणखी वाचा – ‘कमळी’ मालिकेत मोठा ट्विस्ट, कामिनीला महाजनांनी काढलं घराबाहेर, म्हणाली, “कामिनी आजी घराबाहेर निघा…”
मात्र हे नातं सुरुवातीला उपकार आणि नाइलाजाच्या आधारावर सुरू झालं होतं, असंही त्यांनी सांगितलं. पुढे जशी अरुणा इराणी यांना लोकप्रियता मिळत गेली, तसतसे त्यांच्या आयुष्यात बदल होत गेले. या मुलाखतीदरम्यान अरुणा इराणी यांनी असा खुलासा केला की, मेहमूद यांनी अनेक वेळा त्यांचा फायदा उचलला. शिवाय, मेहमूद विवाहित असतानाही त्यांचं नाव सतत अरुणा इराणी यांच्याशी जोडलं जात होतं. पुढे त्यांनी सांगितलं की, मेहमूद यांना अरुणा इराणी यांच्याशी तिसऱ्यांदा लग्न करायचं होतं, मात्र अरुणा इराणी यांच्या आईला हे मान्य नव्हतं. इतकंच नाही, तर मेहमूद यांनी अनेक ठिकाणी आपण अरुणा इराणी यांच्याशी लग्न केल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. या अफवांमुळे चित्रपट निर्मात्यांनी अरुणा इराणी यांना काम देणं बंद केलं. निर्मात्यांना अशी भीती वाटायची की, “जर अरुणा इराणी प्रेग्नंट असतील, तर चित्रपट अर्धवट राहील.” असंही त्यांनी स्पष्ट केलं. मेहमूद यांच्यासोबतच्या या अफवांमुळे जेव्हा अरुणा इराणी यांचं करिअर धोक्यात आलं होतं, तेव्हा मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार दादा कोंडके त्यांच्या मदतीला धावून आले. दादा कोंडकेंनी त्यांना चित्रपटात संधी दिली. त्यामुळे अरुणा इराणी यांना पुन्हा अभिनयाची संधी मिळाली.
आणखी वाचा – हाताला जखमांचे व्रण…; अपघातानंतरही १४ तास शुटिंग करतोय ‘सावळ्याची जणू…’ फेम अभिनेता, म्हणाला, “थोडक्यात…”




