Vishakha Subhedar post : कोणतंही कारण असो वा नसो कलाकारांना ट्रोलिंगची शिकार व्हावंच लागतं. अनेकदा ही कलाकार मंडळी या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देतात. तर काहीवेळेस या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. हे ट्रोलिंग बरेचदा त्यांना सहन न होणारं असतं आणि म्हणूनच ही कलाकार मंडळी आवाज उठवताना दिसतात. बरेचदा ट्रोलिंगवर भाष्य करणाऱ्या वा ट्रोलर्सला उत्तर देणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा यांनी आजवर अनेकदा ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. अशातच विशाखा यांनी ट्रोलर्सच्या बळी पडणाऱ्या कलाकारांची बाजू घेत एक पोस्ट शेअर केली आहे.
विशाखा यांनी पद्यात्मक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका माणसाचा शांत बसलेला फोटो पोस्ट केला आहे आणि त्याखाली कॅप्शन देत ट्रोलिंगबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्रोल करणाऱ्यांना समज देत त्यांनी पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की…
आणखी वाचा – हळद लागली! विशाल-अक्षयाच्या हळदी समारंभाचा थाट, पारंपरिक पद्धतीने पार पडला कार्यक्रम; फोटो समोर
विशाखा यांची पोस्ट
ट्रोल…. 😔
प्रेक्षक आज समोर बसत नाही,
तो स्क्रीनच्या मागे लपतो,
दोन ओळी लिहून
कलाकाराचं संपूर्ण आयुष्य
मोजून टाकतो.
“फार काही नाही.”
“Overacting.”
“हिला कुणी घेतलं?”
हे शब्द
‘हलके”
वाटतात वाचताना,
पण कलाकारासाठी
ते पूर्ण दिवसाचं ओझं होतात.
स्टेजवर उभं राहून
अपयश स्वीकारणं सोपं असतं,
पण ट्रोलिंगमध्ये
अपयशाला
चेहरा नसतो.
प्रेक्षक विसरतो—
कलाकार हा पोस्ट नाही,किंवा AI नाही.
तो मन आहे,
श्वास आहे,
रोज स्वतःला
उघडं ठेवून काम करणारा माणूस आहे.
ट्रोल करणाऱ्याला
कलाकाराचं मौन
कमजोरी वाटतं,
पण ते मौन
पुढच्या भूमिकेची
तयारी असते.
कलाकार आजही येतो,
ट्रोलिंग खाली नाही,
तर स्टेजच्या spot light मध्ये..
कारण काही जण
हसतात चिडवतात, डिवचतात म्हणून नाही,
तर काही जण
समजून घेतात प्रेम करतात म्हणून.
प्रेक्षक हसतो,
टाळी वाजवतो,
आणि निघून जातो—
जसं काही
हलकी करमणूक पाहून आलो,
पण स्टेजवर उभा असलेला कलाकार
हलका नसतो,
तो आतून
खूप भार घेऊन उभा असतो.
काही तासांचा अभिनय
म्हणजे फक्त तास नाहीत,
त्याआधीचे
अनेक दिवस,
अनेक अपयश,
आणि न बोललेले प्रश्न असतात.
प्रेक्षक म्हणतो—
“आज फार भारी नव्हतं.”
पण कलाकार
पूर्ण रात्र,
तेच वाक्य…
मनात घोळवत बसतो.
कारण कलाकार
टाळीवर जगतो असं असलं जरी ,
तरी तो मान्यतेवर तग धरतो.
कधी कधी
प्रेक्षक कलाकाराला
हलके घेतो,
पण त्याला माहीत नसतं—
मन उघडं ठेवून उभं राहणं
हे सगळ्यात अवघड काम असतं.
पण तरीही
कलाकार उद्या पुन्हा येतो,
तेच स्टेज,
तोच प्रकाश,
आणि नव्यानं
स्वतःला मांडतो.
कदाचित म्हणूनच
तो हलका वाटतो,
कारण तो
सगळं जडत्व
आत ठेवतो.
रंग लावून
इतरांना रंगात भिजवतो…!..
……………..विशाखा.
दरम्यान, सध्या ट्रोलर्सची कानउघडणी करणारी विशाखा यांची पोस्ट व्हायरल होत असून यावर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत त्यांना पाठिंबा दिला आहे.





