डॉ. निलेश साबळेच्या ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ या शोची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या शोची घोषणा झाल्यापासूनच अनेकांना या शोची उत्सुकता लागून राहिली होती. गेले काही दिवस या शोचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अशातच आता या शोचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम यांचे प्रहसन चालू असल्याचे पाहायला मिळत असून त्यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा” चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसतानाचे दिसत आहे.
नुकताच ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाचा हा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित असणार आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या स्किटमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम हे दोघेही स्त्रीपात्र साकारत असून त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील अभिनेत्रींचा लूक केला आहे. अनेकांना हा प्रोमो आवडला आहे, मात्र काहींनी या प्रोमोवर टीका केली आहे.
ओंकार भोजने व भाऊ कदम यांनी साकारलेल्या स्त्री पात्रांवर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. “साडी नेसून कॉमेडी करायची गरज आहे का?, हा कार्यक्रम अगदी ’चला हवा येऊ द्या’ सारखाच आहे, पुन्हा तेच तेच जबरदस्तीचं हास्य, बायकांचे रोल करायला बायका मिळत नाहीत का?, फॉरमॅट तोच आहे फक्त नाव नवीन आहे.” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओवर प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे?’ या शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. येत्या २७ तारखेपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.