“हसताय ना?, हसायलाच पाहिजे” असं म्हणत ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळेने अनेक रसिकांच्या मनात त्याचे घर केले. मात्र काही दिवसांपूर्वी निलेश साबळेने या शोमधून एक्झिट घेतली. त्यावेळी काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याचे त्याने सांगितले होते. अशातच त्याने ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ या नवीन शोची घोषणा केली. कलर्स मराठीवर हा नवा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या शोचा प्रोमो चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ”हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कॉमेडी शोमध्ये निलेश लेखन, दिग्दर्शन व सूत्रसंचालनाची जबाबदारी पाडणार आहे.
निलेश साबळे हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याने शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि हा व्हिडीओ आहे त्याच्या आगामी ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ या शोचा. निलेश साबळेने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याच्या चेहऱ्यावर आगामी शोची उत्सुकता दिसत आहे. “नवीन सुरूवात करत आहे. तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा असू द्या” असं म्हणत निलेशने त्याच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
काही वेळापूर्वी हा शोच्या पहिल्या प्रहसनाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता आणि या प्रोमोमध्ये ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची संपूर्ण टीम दिसली. तीच टीम निलेशच्या या व्हिडीओमध्येदेखील पाहायला मिळत आहे. निलेशने शेअर केलेला हा व्हिडीओ ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ या शोच्या पहिल्या भागाच्या शूटिंगच्या पडद्यामागच्या क्षणांचा आहे. या व्हिडीओला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे?’ या शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. येत्या २७ तारखेपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.