‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय शो ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाला चाहते भरभरून प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. कार्यक्रमात सहभागी असलेल्या स्पर्धकांचा खेळ प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सर्वांचा लाडका राणादा म्हणजेच हार्दिक जोशी सांभाळत आहे. याआधी हार्दिकने साकारलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील रानादा या भूमिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर आता या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असलेल्या हार्दिकवरही प्रेक्षक तितकंच भरभरून प्रेम करत आहेत. (Hardeek Joshi Propose Akshaya Deodhar)
‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. परंतु, आता लवकरच या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक हार्दिक जोशीला ‘जाऊ बाई गावात’च्या टीमकडून एक खास सरप्राईज मिळालं आहे. आता कार्यक्रमात मकर संक्रांती स्पेशल भाग होणार आहे. यानिमित्त हार्दिकला ‘जाऊ बाई गावात’च्या टीमकडून एक सरप्राईज मिळत आहे. या सरप्राईजमुळे हार्दिकची यंदाची मकरसंक्रांत खास असणार आहे.
२०२४ या वर्षातील पहिल्या सणाच्या निमित्ताने ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमात हार्दिकची पत्नी अक्षया देवधर हजेरी लावणार आहे. हार्दिक व अक्षयासाठी यंदाची मकरसंक्रात खास असणार आहे. अक्षया यावेळी पारंपरिक अंदाजात हजेरी लावली आहे. नुकताच या भागाचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अक्षयाचा संक्रांती स्पेशल लूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. अक्षयाने यावेळी काळी पैठणी साडी नेसलेली पाहायला मिळाली. अक्षयाचा हा पारंपरिक लूक खूप खास होता.
यावेळी हार्दिकने अक्षयाला गुडघ्यावर बसून प्रपोज केलेलं पाहायला मिळालं. यावेळी हार्दिक अक्षयाला “आय लव्ह यु अक्षया, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं म्हणत प्रपोज करतो. तर अक्षयाही लाजत “माझंही” असं म्हणते. दरम्यान उपस्थित कलाकार मंडळी जोरात ओरडताना दिसत आहेत.