अभिनेत्री राधिका आपटे ही स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अशातच राधिका हिने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. राधिकाने ही पोस्ट शेअर करत फ्लाइटला उशीर झाल्यामुळे ती अडकल्याचे सांगितले आहे. ती इतर प्रवाशांसह विमानतळावरील एरोब्रिजमध्ये अडकली असल्याचं समोर आलं आहे. राधिकाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ व फोटो पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या फ्लाइटला उशीर झाला तेव्हा सुरक्षा दार उघडले नाही आणि एअरलाइन कर्मचार्यांना याबद्दल काहीही माहित नव्हते. राधिकाने एक क्लिप शेअर केली ज्यामध्ये बंद काचेच्या दरवाजामागे अनेक लोक दिसत आहेत. काही लोकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांशीही चर्चा केली. काही फोटोंमध्ये ती तिच्या टीमसह जमिनीवर बसलेली दिसली. (Radhika Apte Post)
फोटो शेअर करत राधिका आपटेने लिहिले आहे की, “अखेर मला ही गोष्ट पोस्ट करावी लागत आहे. आज सकाळी साडेआठ वाजता माझी फ्लाइट होती आता १०.५० झाले आहेत. तरीही अद्याप फ्लाइटचा काहीच पत्ता नाही. फ्लाइट लवकरच येईल असं सांगून आम्हा सगळ्या प्रवाशांना एरोब्रिजमध्ये बसवलं आणि बाहेरून लॉक करण्यात आलं आहे. याठिकाणी काहीजण त्यांच्या लहान मुलांबरोबर प्रवास करत आहेत. वृद्ध प्रवासी, लहान मुलं सगळ्यांनाच गेल्या तासाभरापासून कोंडून ठेवलं आहे” असं तिने म्हटलं आहे.
यापुढे तिने, “सुरक्षारक्षक दरवाजे उघडण्यास तयार नाहीत. येथील कर्मचाऱ्यांना कशाचीही पूर्ण माहिती नाही. त्यांचे क्रू मेंबर्स आलेले नाहीत. शिफ्टमध्ये बदल झाल्याने ते अजूनही नवीन क्रूची वाट पाहत आहेत. आता नवीन क्रू केव्हा येईल? याची कोणालाही कल्पना नाही आणि आम्हाला असं किती काळ बंद करून ठेवणार याबाबतही काहीच माहिती नाही. बाहरेच्या एका मूर्ख कर्मचारी महिलेशी बोलण्यासाठी मी गेले. पण ती फक्त तुम्हाला काहीच अडचण येणार नाही एवढंच सांगत होती. १२ वाजेपर्यंत ना पाणी ना वॉशरुम काहीच सुविधा नाही! या सुंदर प्रवासासाठी खूप धन्यवाद!”असं तिने म्हटलं आहे.
राधिका अलीकडेच श्रीराम राघवनच्या ‘मेरी ख्रिसमस’मध्ये छोट्या भूमिकेत दिसली होती. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात ७ कोटींची कमाई केली आहे.