मराठीमधील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाला एक महिन्यांपेक्षा अधिक दिवस उलटले आहेत. तरीही त्यांचं निधन कसं झालं? ते एकटे का राहत होते? अशा असंख्य प्रश्नांची चर्चा सुरु आहे. रवींद्र यांचा मुलगा व अभिनेता गश्मीर महाजनीने यादरम्यान बराच वाईट काळ अनुभवला. तसेच त्याच्यावर करण्यात आलेल्या टीकेला तो सामोरा गेला. आता त्याने एका पॉडकास्टमध्ये वडिलांबाबत खुलासे केले आहे.
‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. वडिलांबाबत बोलताना तो म्हणाला, “मी अवघा १५ वर्षांचा होतो. माझी दहावी झाली होती. त्यावेळी मला कळालं की आमच्यावर कर्ज आहे. त्यावेळी त्यांनी (वडिलांनी) घरामधून निघून जाण्याचा निर्णय घेतला. ते आम्हाला म्हणाले की, आता तुम्ही तुमचं बघा कारण घर आईच्या नावावर होतं. बँकेचे रिकव्हरी डिपार्टमेंटमधील आठ ते दहा लोक दारावर यायाचे. मी लहान आणि माझी आई एकटी बाई. अगदीच भीती वाटायची”.
“बँकेत जाऊन आम्ही त्यांच्या हातापाया पडून हे सांगितलं आहे की, बाबा नसेल तरी आम्ही तुमचं कर्ज फेडू. घर नसेल तर आम्ही तुमचं कर्जही फेटू शकत नाही असं आम्ही म्हटलं. त्यानंतर बँकमध्ये आमच्या नशिबाने त्यांनी ऐकलं. एक हफ्ता त्यांनी ठेवला होता. ते मी फेडत गेलो. रात्री आम्ही जाऊन रस्त्यावर पोस्टर लावायचो. आमची एक घाणेरडी मारुती ८०० कार होती. ती घेऊन आई यायची आणि मी पोस्टर लावायचो. तिथपासून आमचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर कॉर्पोरेट इव्हेंट मी करु लागलो. कॉर्पोरेट इव्हेंटने मला सर्वाधिक पैसे मिळवून दिले”.
“वयाच्या २१व्या वर्षी मी कर्ज फेडलं. त्यासाठी मला सहा वर्ष लागली. त्यानंतर मी आईला म्हटलं की, सहा वर्षांनंतर एक अशा इव्हेंटची मी वाट पाहत आहे की, आपण कमावलेले पैसे मला कोणाला द्यायचे नाहीत. आम्ही फक्त मान मोडून काम करायचो. आता माझी बीएमडब्ल्यु आहे. एवढा मोठा फ्लॅट आहे. पण हे सगळं बापामुळेच मिळालं ना असं लोक बोलतात. पण त्याचा आता मला फरक पडत नाही”. गश्मीर स्वतःच्या मेहनतीने आज मिळालेलं सुख अनुभवत आहे.