टेलिव्हिजनवरील एकेकाळी गाजलेली मालिका ‘शक्तिमान’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात आहे. या मालिकेमध्ये अभिनेते मुकेश खन्ना हे प्रमुख भूमिकेमध्ये दिसून आले होते. सध्या ते मनोरंजन क्षेत्रात सक्रिय नसले तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असलेले पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी बॉलिवूड अभिनेत्यांवर तंबाखूच्या जाहिरातीमध्ये काम करत असल्याने निशाणा साधला होता. सगळे कलाकार पैशासाठी हे सगळं करत असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं होतं. मुकेश यांना जी गोष्ट पटत नाही त्यावर ते टीकादेखील करतात.अशातच आता त्यांनी एका अभिनेत्यावर निशाणा साधला आहे. ज्यामुळे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा वक्तव्य करुन चर्चेत आले आहेत. (mukesh khanna on kapil sharma)
मुकेश यांनी नुकताच विनोदी कलकार कपिल शर्मावर निशाणा साधला आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये कपिलला असभ्य असेही म्हंटले असून ‘अश्लील’ असा टॅग दिला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारले की, “द कपिल शर्मा शो’ व ‘बिग बॉस’ अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे का?” त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “कपिल एक चांगला विनोदी कलाकार आहे यामध्ये काहीही दुमत नाही. पण मला त्याचा स्वभाव पटत नाही. कपिलबरोबर सहज वावरु शकत नाही असं मी कृष्णा अभिषेकलादेखील सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, “मला दोन्हीही कार्यक्रम खूप अश्लील वाटतात. ‘कॉमेडी सर्कस’मध्ये हे लोक एकाच स्किटमध्ये काम करायचे. त्यावेळी कपिलने शक्तिमानचा पेहराव परिधान केला होता. कपिलच्या समोर एक मुलगी होती आणि बाजूला एक बेड होता. आम्ही ही व्यक्तिरेखा खूप मेहनतीने तयार केली आणि तुम्ही बेडच्या इथे शक्तिमानचा पेहराव दाखवून तुम्ही काय सांगू इच्छिता. तुम्ही हे सगळं विनोदासाठी करत आहात. मी कृष्णाला फोन केला आणि याबद्दल विचारलं. त्याने सांगितलं की ते स्किट मी करणार होतो पण नंतर ही भूमिका कपिलने साकारली”.
तसेच कपिलबरोबर सहजता नसण्याबद्दल मुकेश यांनी सांगितले की, “मी व कपिल एका इव्हेंटमध्ये एकत्र आलो होतो. कपिलने त्यावेळी त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. कपिल माझ्याबरोबर 15-20 मिनिटं बसला होता. पण तो माझ्याशी काहीही बोलला नाही. त्याने त्याचा पुरस्कार घेतला आणि निघून गेला. कपिल मला खूप असभ्य वाटला. जेव्हा कोणी असं वागतं तेव्हा त्याची इज्जत गेलेली असते. तुम्ही स्वतःला इतकं मोठं का समजता?” सध्या कपिल ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चे दुसरे पर्व सुरु आहे.