मराठी मनोरंजन सृष्टीतील सदाबहार जोडपे म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. गेली कित्येक वर्षे हे दोघे मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. ऐश्वर्या व अविनाश यांनी आपल्याला नव्या जमन्याबरोबरसुद्धा अपडेट ठेवले आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. तिथे फोटो, व्हिडीओ अपडेट करत असतात. मात्र काही दिवसांपासून त्यांना त्यांच्या रील्समुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. या ट्रोलर्सना ऐश्वर्या वेळोवेळी सडेतोड उत्तरदेखील देतात. अशातच त्यांनी पुन्हा एकदा या ट्रोलर्सबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. आजपासून सुरु झालेल्या नवरात्रोत्सवानिमित्त ‘इट्स मज्जा’ने ऐश्वर्या यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना सोशल मीडियावरील ट्रॉलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. (Aishwarya Narkar On Trollers)
यावेळी ऐश्वर्या यांनी ट्रोल करणाऱ्यांपैकी ९० टक्के या स्त्रियाच असल्याचं म्हटलं आहे. याबद्दल ऐश्वर्या असं म्हणाल्या की, “ट्रोल करणाऱ्या अकाउंट्सची नावे बघितली तर त्यात ९० टक्के स्त्रियांची नावे असतात. युट्यूबवर काही अकाउंट्स त्याचीच चिकित्सा करण्यासाठी असतात. त्याच्यात बायकांचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. मध्ये मी पूजेचा एक व्हिडीओ टाकला होता, त्यावर अनेक स्त्रियांच्या कमेंट्स होत्या आणि यात हो ला हो करणारे ग्रुप कार्यरत असतात. त्या पूजेला मी स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. त्यामुळे स्लीवलेस ब्लाऊज घालून पूजेला बसू नये अशा अनेक कमेंट्स होत्या. तर मला असं वाटतं की, चित्र-विचित्र बोलणे हीदेखील आपली संस्कृती नाही. आपल्या घरात आपण कोणत्या कपड्यांत आहोत आणि त्यात जर आपण आरामशीर पद्धतीने पूजा वगैरे करत असू तर उद्देश पूजा करण्याचा आहे ना की कपडे घालण्याचा”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “या सगळ्यात बायका सहभागी असतात. त्यामुळे मी ट्रोलर्सना सांगू इच्छिते की, एखादा माणूस सुखी जगत असेल आणि त्याच्या पद्धतीने आणि आवडीने जगत असेल तर असे विचित्र आणि घाण कमेंट्स करुन दुसऱ्यांचं मनस्वास्थ्य बिघडवण्याचा आपल्याला अधिकार नाही. त्यासाठी सोशल मीडिया नाही. पण जर बायकाच बायकांना ट्रोल करत असतील आणि ज्या व्यक्तीशी आपला काहीही संबंध नाही त्यांना आपण असं बोलत असू तर मला हे भीती वाटते की यांच्या घरच्या लेकी-सुनांबरोबर या कशा वागत असतील?. ट्रोलऐवजी जर बायकांनी एकमेकींना समजून घेतलं तरच आपण पुढे जाऊ आणि एकमेकींच्या पाठीशी खंबीर उभ्या राहू. ज्यावेळी पुरुष वाईट कमेंट किंवा ट्रोल करतात. तेव्हा आपण त्यांच्याविरुद्ध उभं राहायला पाहिजे”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीच्या बोलण्यामध्ये आला अभिजीत, अंकिताची चुगली येऊन सांगितली अन्…; एकमेकांवर आरोप
या मुलाखतीमध्ये पुढे त्यांनी ट्रोलर्सच्या बोलण्याकडे फार लक्ष न देता अशा वाईट कमेंट्स करणाऱ्या लोकांना ब्लॉक करण्याबद्दल म्हटलं आहे. दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबदल बोलायचे झाले तर त्या सध्या झी मराठी वहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत त्यांची मैथिली सेन गुप्ता अशी नवीन भूमिका आहे.