Like Aani Subscribe : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अमेय वाघ यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘लाईक आणि सबस्क्राइब’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली होती. त्यानंतर ‘लाईक आणि सबस्क्राइब’ या चित्रपटाचा रहस्यमयी टीझर प्रदर्शित झाला आणि हा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत आतुरता वाढली. अशातच आता या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हे वाक्य सर्वश्रृत आहे. रोजच्या वापरात आपण हा शब्द ऐकला आणि वाचला आहे. (Like Aani Subscribe Movie Trailer)
‘लाईक आणि सबस्क्राइब’च्या या ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच अमेय वाघ कुणाच्या तरी तोंडचे “आखरी सांसे गिन रहे है बस असं बोलला होता ना? मग गिनू दे त्याला आखरी सांसे” या वाक्याने होते. त्यामुळे या चित्रपटाचा संबंध एका मर्डर मिस्ट्रीशी असल्याचा वाटत आहे. तसंच या पूर्ण ट्रेलरमध्ये कुणा एका व्यक्तीच्या मरण्याबद्दल आणि जीवंत राहण्याबद्दलचे अनेक संवाद पाहायला मिळत आहे. तसंच अभिनेत्री अमृता खानविलकरही पोलिसांच्या मदतीने कसला तरी शोध घेत असल्याचेही यातून पहायला मिळत आहे. तसंच जुई भागवत ही अभिनेत्री व्लॉगरच्या भूमिकेत आहे. तसंच यात काही संवादही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. यापैकी एक संवाद म्हणजे “प्रेम असो वा स्कॅम जोपर्यंत स्वत:बरोबर होत नाही तोपर्यंत खोटंच वाटतं राहत”.
त्यामुळे एकूणच या ट्रेलरवरुन हा चित्रपट स्कॅम आणि खून यासंबंधित असल्याचे दिसून येत आहे. ‘लाईक आणि सबस्क्राइब’चा हा नुकताच आलेला नवीन ट्रेलर सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तसंच या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकाही त्यांच्या इतर कलाकृतींपेक्षा वेगळ्या असल्याचे जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यात अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ यांचा सेल्फी होता. त्यानंतर चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला होता. अशातच आता ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या ट्रेलरमध्ये खून आणि स्कॅमचा एकमेकांशी संबंध असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सगळ्याचा परस्परांशी काही संबंध आहे का? तसंच यात मृतदेह आणि एका खुनाचाही उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे हे प्रकरण नक्की काय आहे? कोणी कोणाचा खून केला? अमृता खानविकार कसल्या आणि कोणत्या पुराव्यांच्या शोधात आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटामधून मिळणार आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीच्या बोलण्यामध्ये आला अभिजीत, अंकिताची चुगली येऊन सांगितली अन्…; एकमेकांवर आरोप
दरम्यान, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, जुई भागवत, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, विराट मडके, राजसी भावे, पुष्कराज चिरपूटकर आणि शिवराज वैचल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.