मराठी संगीत विश्वातील एक तरुण लोकप्रिय गायकांची जोडी म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स्’ या लोकप्रिय शोमधून दोघांनी प्रेक्षकांवर राज्य केलं आहे. अशातच या जोडीने नुकताच विवाह करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स्’ या शोमुळे त्यांना लोकप्रियता होतीच. मात्र लग्नानंतर या जोडीच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली असं म्हणायला हरकत नाही.
मुग्धा-प्रथमेश सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असतात. त्यांच्या गायनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर ते चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात आणि त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. दोघेही अनेकदा एकत्र गायनाचे कार्यक्रमही करत असतात. अशातच प्रथमेशने त्याच्या इनस्टाग्राम स्टोरीद्वारे मुग्धाचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे मुग्धाचा फोटो शेअर करत “हार्दिक अभिनंदन बायको” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर “मला तुझा अभिमान आहे” असंही म्हटलं आहे. मुग्धाने मुंबई विद्यापीठातून पदव्यूत्तर शिक्षणात सुवर्ण पदक मिळवले आहे आणि याचनिमित्ताने प्रथमेशने त्याच्या बायकोचे कौतुक केले आहे.
प्रथमेशने त्याच्या स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. यापैकी पहिल्या फोटोमध्ये मुग्धा तिची पदवी स्वीकारतानाचा फोटो पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या एका हातात प्रमाणपत्र व दुसऱ्या हातात सुवर्ण पदक असल्याचे पाहायला मिळत आहे. मुग्धाने संपादन केलेल्या या यशानिमित्त प्रथमेशचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे ही नक्की.
आणखी वाचा – मंगळसूत्रामध्ये काळे मणीच का असतात?, लग्नानंतर बांगड्याच का घालतात?, जाणून घ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं
दरम्यान, काही वेळापूर्वीच मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आज माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी व अभिमानास्पद क्षणासाठी मी खूप आतुर असल्याचे म्हटले होते. त्यामुळे तेव्हापासूनच चाहत्यांना तिच्या आयुष्यातील नेमका हा खास क्षण कोणता असेल याची उत्सुकता लागली होती. अशातच प्रथमेशने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.