प्रसिद्ध यूट्यूबर आणि ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादवविरोधात रेव्ह पार्ट्यांचं आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस एफआयआरनुसार, एल्विश यादव नोएडामध्ये रेव्ह पार्ट्या आयोजित करत असे. तसेच या पार्टीत बंदी असलेले साप आणि परदेशी मुलींनाही प्रवेश मिळाल्याचं समोर आलं. या प्रकरणावरून एल्विशसह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता एल्विश यादवने मौन सोडलं आहे. (Elvish Yadav Clarification)
एल्विश यादवने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एल्विशने रेव्ह पार्ट्यांवरून त्याच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांवर भाष्य केलं आहे. व्हिडीओ शेअर करत तो म्हणाला की, “मी सकाळी उठलो तेव्हा पाहिलं की माझ्या विरोधात कोणत्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. सर्व मीडियाद्वारे असं सांगण्यात येत होतं की, एल्विश यादवला अटक झाली आहे, एल्विश यादव ड्रग्जसह पकडला गेला, या सर्व गोष्टी माझ्याबद्दल पसरवल्या जात आहेत, माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. सर्व आरोप खोटे आहेत, यांत एक टक्केही सत्यता नाही.”
यापुढे बोलताना एल्विश म्हणाला, “मी यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. आणि मी यूपी पोलिस, संपूर्ण प्रशासन, माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांना विनंती करेन की या गोष्टीत माझा एक टक्काही सहभाग आढळला तर मी सर्व जबाबदारी घेण्यास तयार आहे.”
जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत अशा बातम्या प्रसिद्ध करू नयेत, अशी विनंतीही एल्विश याने माध्यमांना केली आहे. तो म्हणाला, “मी मीडियाला विनंती करतो की, जोपर्यंत तुमच्याकडे ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत माझे नाव बदनाम करू नका. आणि जे काही आरोप झाले आहेत, त्यांच्याशी माझा खूप दूरपर्यंत काहीही संबंध नाही. अगदी १०० मैलापर्यंत माझा काही संबंध नाही. हे सिद्ध झाले तर मी जबाबदारी घ्यायला तयार आहे.”