बॉक्स ऑफिसवर सध्या ‘नाच गं घुमा’ या मराठमोळ्या चित्रपटाने धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. १ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला महिलावर्ग भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालक व कामवाली बाई भोवती फिरणार असं या चित्रपटाचं कथानक आहे. चित्रपटात मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून नम्रताने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आता छोटा पडदा गाजवल्यानंतर नम्रता मोठ्या पडद्यावरही मुख्य भूमिकेत धुमाकूळ घालताना दिसत आहे. (Prasad Khandekar Appreciate Namrata Sambherao)
अशातच नम्रताच्या या नव्या इनिंगसाठी तिचा मित्र प्रसाद खांडेकरने खास पत्र लिहिलं आहे. नम्रताने हे पत्र सोशल मीडियावरुन शेअर करत प्रसादचे आभार व्यक्त केले आहेत. या पत्रात प्रसादने असं लिहिलं आहे की, “महाराष्ट्राची लाडकी आणि Talented अभिनेत्री नमा. १ मे ला तुझ्या आयुष्यातील पहिला सुपरहिट सिनेमा ज्यात तू प्रमुख भूमिकेत आहेस. ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. खूप वर्ष या क्षणाची वाट पाहत होते आणि अखेर तो क्षण आला. आताचा हा संपूर्ण काळ जागून घे. यातील प्रत्येक क्षणाचा उपभोग घे. यापुढे तुझ्या नावावर अजून खूप सारे सुपरहिट सिनेमे लागतील पण पहिलं नेहमीच खास असतं. म्हणून १ मे पासूनचा प्रत्येक क्षण साठवून ठेव. आणि अवॉर्ड्ससाठी घरात जागा पण करुन ठेव. अभिनंदन. आणि खूप शुभेच्छा”.
तळटीप: मोबाईल फॉरमॅट झाला तर मेसेज डिलीट होतात पण कागद साधारपणे पाण्याच्या संपर्कात नाही आला आणि थंड तापमान साधारणपणे ३०-४० सापेक्ष आद्रता यांत साठवलेले कागद दीर्घकाळ अगदी शेकडो वर्ष टिकू शकतात. म्हणून हे पत्र लिहिले आहे. तुझ्या पहिल्या सुपरहिट सिनेमासारखा हा कागदही तू हरवला नाहीस तर दीर्घकाळ टिकेल”, असं त्या पत्रात म्हटलं आहे.
ही पोस्ट शेअर करत नम्रताने प्रसादचे आभार मानत म्हटलं की, “सिनेमा प्रदर्शित व्हायच्या एक दिवस आधी तू हे पत्र लिहिलंस. तू नेहमीच प्रोत्साहन देत आला आहेस. सिनेमा सगळीकडे हाऊसफुल्ल सुरु आहे. इतकं सुंदर सरप्राईज. मेरा सच्चा दोस्त. हे इतके अनमोल आहे. आश्चर्यजनक आणि सुंदर सर्जनशील भेट. किती भारी पत्र लिहिलंस तू पश्या”. नम्रताच्या या पोस्टवर प्रसादने कमेंट करत, “तुझ्या कामावर विश्वास होता म्हणून सिनेमा पहायच्या आधी तुला हे पत्र आणि गिफ्ट दिलं. पण सिनेमा पाहिल्यावर हा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरला याचं समाधान लाभलं. तू कमाल काम केलं आहेस नमा”, असेही म्हटलं.