‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला अक्षरा व चारुहास अधिपतीच्या गायनाची आवड जोपासायचं ठरवतात. अधिपतीला गाणं शिकता यावं म्हणून अक्षरा व चारुहास भुवनेश्वरीकडे परवानगी मागतात. त्यानंतर अक्षरा अधिपतीसाठी गायन शिकवण्यासाठी शिक्षिकेला घरी बोलावते, मात्र त्या शिक्षिकेला भुवनेश्वरी परतवून लावतात आणि स्वतः सरगमला गाणं शिकवण्यासाठी घेऊन येतात. सरगम अधिपतीच्या आयुष्यात आली तर अक्षरा त्याच्यापासून दूर जाईल हा डाव रचत भुवनेश्वरी नवीन चाल खेळते. (Tula Shikvin Changalach Dhada Promo)
मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये सरगम अधिपतीला गाणं शिकवायला येते. तेव्हा त्यांच्यात चांगल्याच गप्पा रंगलेल्या असतात. सरगम अधिपतीला म्हणते की, तुमचा मिश्किल स्वभाव, तुमचं बोलणं मला फार आवडतं. सरगम अधिपती यांच्यातील संवाद अक्षरा ऐकते तेव्हा अक्षरा चिडते आणि म्हणते की, तुमच्या गप्पा झाल्या असतील तर शिकवणीला सुरुवात करायची का?, पहिल्याच दिवशी अधिपती सरगमला मास्तरीण बाई म्हणतात म्हणून अक्षराला खूप राग आलेला असतो. तर अक्षरा व अधिपती बाहेर जातात तेव्हा अधिपती अक्षराला विचारतो, तुम्ही माझ्यावर का रागावला आहात?.
यावर अक्षरा म्हणते की, तुम्हाला चांगलंच माहीत आहे मी तुमच्यावर का रागावले आहे. मात्र अधिपती मुद्दाम अक्षराकडून काढून घेतो. अक्षरा म्हणते की, तुम्ही त्यांना इतर काही म्हणू शकला असता तुम्ही मास्तरीण बाई असं का म्हणालात?, मास्तरीन बाई यावर फक्त माझा हक्क आहे. तुम्ही त्यांना मॅडम बोलू शकला असता. यावर अधिपती म्हणतो की, हो मी त्यांना मॅडम बोलू शकलो असतो, पण मला मास्तरीन बाई बोलणं सोप्पं वाटतं, म्हणून मी बोलून गेलो.
आता अधिपतीच्या आयुष्यात आलेली ही गायनाची शिक्षिका सरगम अधिपती व अक्षरा यांच्यातील वादाचं ठरणार का?, भुवनेश्वरीचा हा नवा डाव यशस्वी होणार का?, की अक्षरा हा डाव उधळून लावणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.