अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही एक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आजवर दिव्यांकाने मालिकाविश्वात छाप पाडत प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्रीने ‘बनू मैं तेरी दुल्हन’ मालिकेतील ‘विद्या’च्या भूमिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतील ‘डॉक्टर इशिता भल्ला’च्या भूमिकेने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय या मालिकेच्या सेटवर दिव्यांकाची भेट अभिनेता विवेक दहियाशी झाली आणि हळूहळू दोघेही प्रेमात पडले. नंतर ८ जुलै २०१६ रोजी दोघांनी लग्न केले. (Divyanka Tripathi Accident)
अशातच आता दिव्यांकाबाबत खूप मोठी अपडेट समोर आली आहे. दिव्यांकाचा अपघात झाला आहे आणि तिने हॉस्पिटलच्या बेडवरून एक फोटो शेअर केला आहे. १८ एप्रिलला दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला आणि तिचा पती विवेक दहियाने तिच्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. अभिनेत्रीच्या पीआर टीमने जास्त माहिती दिली नसली तरी दिव्यांकाच्या हातातील दोन हाडे मोडली आहेत आणि ती आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. तिने उपचारादरम्यानचा एक एक्स-रे फोटो देखील शेअर केला आहे. अभिनेत्री सध्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे.

बायकोच्या अपघाताची बातमी कळताच विवेक दहियाने त्याचे लाईव्ह सत्र पुढे ढकलले आणि पत्नी दिव्यांकाशी संपर्क साधला. त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याने चाहत्यांना पत्नीबद्दल अपडेट दिले आहेत. त्यात लिहिले आहे की, “आम्हाला हे जाहीर करताना दुःख होत आहे की, उद्याचे नियोजित विवेकचे थेट सत्र पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. दिव्यांकाचा काही तासांपूर्वी अपघात झाला आहे आणि आता ती वैद्यकीय देखरेखीखाली आहे. दिव्यांका बरी झाली की विवेक हे सत्र सुरु करणार आहे. तुमच्या समजुतीबद्दल आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आणि दिव्यांकाला लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करा”.
८ जुलै २०२२ रोजी दिव्यांका त्रिपाठी दहिया आणि तिचा पती विवेक दहिया यांच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण झाली. यावेळी अभिनेत्रीने तिच्या पतीबरोबरचे सुंदर फोटो शेअर करुन तिच्या चाहत्यांना भावुक केले.