आशयघन चित्रपट आणि परेश मोकाशी हे एक समीकरण झालं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. वाळवी या चित्रपटानंतर परेश मोकाशी यांची एक नवी कलाकृती आपल्या भेटीस येणार आहे. ही कलाकृती म्हणजे सध्या चर्चा असलेला ‘नाच गं घुमा’. येत्या १ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टीझरने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बरेच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती. चित्रपटाच्या मोशन पोस्टरने ही उत्सुकता द्विगुणित केली. (Naach Ga Ghuma Teaser)
अशातच आता या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते”, या डायलॉगने टीझरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या प्रत्येक महिलेला घरकामात हात लावण्यासाठी आणखी दोन हातांची आवश्यकता असते आणि ही आवश्यकता पूर्ण करणारी स्त्री म्हणजे घरकाम करणारी कामवाली बाई. आजकाल ऑफिसला जाणाऱ्या, वा एखाद्या व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेला कामवाली बाईची आवश्यकता असते. आणि एखाद दिवशी ही बाई कामावर आली नाही तर काय घडू शकतं याचं हुबेहूब वर्णन या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
टीझरमध्ये मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. तर भाडीपाचा फाउंडर सारंग साठे याची देखील भूमिका पाहायला मिळत आहे. तर छोट्या मायरा वायकुळच्या अभिनयाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, बालकलाकार मायरा वायकुळ या कलाकारांचा अभिनय पाहणं रंजक ठरतंय.
टिझरने ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची उत्सुकता वाढवून ठेवली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी केलं आहे. तर लेखक म्हणून परेश मोकाशी व मधुगंधा कुलकर्णी या दोघांनी जबाबदारी सांभाळली आहे. जर एखादी स्त्री तिच्या घरची ‘राणी’ असेल, तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी ‘परीराणी’च्या रुपात समोर येते असं या चित्रपटाचं आगळंवेगळं कथानक आहे.