लेखक-दिग्दर्शक व अभिनेता दिग्पाल लांजेकरने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांची शौर्यगाथा सांगणारे ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेरशिवराज’, ‘सुभेदार’सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा इतिहास चित्रपटांमधून सर्वांसमोर मांडणारे लेखक-दिग्दर्शक दिग्पालने आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी दिग्पालने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. (Shivrayancha Chhava New Poster)
दिग्पालने हे पोस्टर शेअर केल्यापासूनच त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी व चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार याविषयीची उत्सुकता लागली होती. अशातच आता चित्रपटाचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या नवीन पोस्टरने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या नवीन पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत एका अभिनेत्याची झलक पाहायला मिळत आहे. तसेच त्याच्यामागे एक सिंहदेखील दिसत आहे.
दिग्पालने हे नवीन पोस्टर शेअर करत “गर्जतो आमच्या देही… रक्त बिंदू रक्त बिंदू… राजे आले आमचे… आले रौद्र शंभू रौद्र शंभू” असं म्हटलं आहे. हे नवीन पोस्टर प्रदर्शित होताच यावर नेटकऱ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार याविषयी उत्सुकता लागली आहे. अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टखाली “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार?” असं म्हणत विशाल निकम, वैभव तत्त्ववादी या अभिनेत्यांची नावे घेतली आहेत. तर अनेकांनी “जय शिवराय, जय शंभूराजे” अशा अनेक कमेंट्स करत या पोस्टला चांगलाच प्रतिसाद दिला आहे..
ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मल्हार पिक्चर्स कंपनीचे वैभव भोर, किशोर पाटकर व मधू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सहनिर्माते भावेश रजनीकांत पंचमतीया हे आहेत. संभाजी महाराजांच्या धगधगत्या पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद व गाणीदेखील त्यांचीच आहेत. तसेच या गाण्यांना साजेसं संगीत संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे आणि पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.