मुळशी पॅटर्न व ‘धर्मवीर’ या लोकप्रिय चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे क्षितीश दाते. ‘धर्मवीर’ या चित्रपटात त्याने साकारलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका विशेष गाजली. अभिनेत्याने आजवर अनेक मालिका व चित्रपटांमधून अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. क्षितीश त्याच्या अभिनयामुळे जितका चर्चेत असतो, तितकाच तो सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. अशातच अभिनेता त्याच्या एक नवीन पोस्टमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. (Kshitish Date On Instagram)
क्षितीशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास फोटो शेअर करत नवीन गाडी घेतल्याची बातमी शेअर केली आहे. क्षितीशने नुकतीच एक नवीन बाईक घेतली असून ही आनंदाची बातमी त्याने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. “इनफील्ड घेतली” असं म्हणत त्याने बाईकबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या फोटोखाली चाहत्यांनी अभिनंदन व कौतुकाच्या अनेक कमेंट्स केल्या आहेत.
आणखी वाचा – “सासू माझी ढासू…”, हेमंत ढोमेच्या सासुला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा, लेक क्षिती जोगचा व्हिडीओही चर्चेत
अभिनेत्री अमृता देशमुख, आरती मोरे, ईशा केसकर, विभावरी देशपांडे, दीप्ती लेले, पिट्या परदेशी यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट्समध्ये क्षितीशला या नवीन बाईकसाठी अभिनंदन म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या अनेक चाहत्यांनीही “एक नंबर, रॉयल माणूस, खुप भारी, अभिनंदन, जबरदस्त, खतरनाक” अशा अनेक कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे.
दरम्यान, क्षितीशच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, येत्या २६ जानेवारीला त्याचा नवीन ‘नवरदेव Bsc. Agri.’ हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर ‘धर्मवीर’ या बहूचर्चित चित्रपटाचा दूसरा भागसुद्धा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची झलक दाखवली होती. त्यामुळे त्याच्या या आगामी दोन्ही चित्रपटांसाठी चाहते आतुर आहेत.