ऋतिक रोशन व दीपिका पादुकोण यांच्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटाची गेले अनेक दिवस सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच अनेक चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. अशातच आता या चित्रपटाचा ट्रेलरही चाहत्यांच्या भेटीला आला आहे. १० जानेवारी म्हणजेच ऋतिकच्या वाढदिवशी निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार? याविषयी उत्सुकता निर्माण केली होती आणि तीच उत्सुकता आता पूर्ण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. (Fighter Movie Trailer Out)
नुकताच ‘फायटर’ या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला असून ३ मिनट, ०९ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये दीपिका व ऋतिकच्या यांच्या दिमाखदार रोलची हटके झलक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर वायु सेनेच्या पराक्रमाची कथाही या ट्रेलरद्वारे पाहायला मिळत आहे. “फायटर वो नहीं है जो अपने टार्गेट अचिव्ह करता हैं, वो है जो उन्हें ठोक देता है” या हृतिकच्या डायलॉगनं फायटर फायटर या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. त्यानंतर ट्रेलरमध्ये दीपिका आणि अनिल कपूर यांची झलक दिसते. या ट्रेलरमध्ये अंगावर शहारे आणणारे अनेक सीन्स या ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. याआधी चित्रपटाचा पोस्टर, टीजर व गाणी आधीच प्रेक्षकांच्या आवडली होती. त्यानंतर हा ट्रेलरही चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
हेही वाचा – ‘या’ दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘द इंडियन पोलिस फोर्स’ व ‘एक्स्ट्रा ऑर्डीनरी मॅन’, पाहा संपूर्ण यादी
‘फायटर’ या चित्रपटात हृतिकने स्क्वाड्रन लीड शमशेर पठानियाची भूमिका साकारली आहे, तर दीपिका पदुकोण ही स्क्वाड्रन लीडर मीनल राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. हृतिक रोशनने नुकताच ‘फायटर’चा खास ट्रेलर त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलचा हा खास व्हिडीओ शेअर करत त्याने असे म्हटले आहे की, “दिल आसमान के नाम, और जान देश के नाम।जय हिन्द!” हृतिकने शेअर केलेल्या ट्रेलरवर चाहत्यांनीही लाइक्स व कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे आणि त्यांना हा ट्रेलर आवडल्याचेदेखील म्हटले आहे. “मी माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वोत्तम ट्रेलर, अक्षरश: शहारे आले, उत्तम चायाचित्रण, उत्तम व्हीएफएक्स, उत्तम संवाद, उत्तम वेशभूषा आणि उत्तम संगीत. खूपच छान ट्रेलर, जबरदस्त अॅक्शन, कमाल” अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला तुफान प्रतिसाद दिला आहे.
‘फायटर’ या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोणसह अभिनेते अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोवर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख आदी कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत हे नक्की.