Kunal Kamra Controversy : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये झालेल्या शोदरम्यान कुणालने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक गाणं सादर केलं. हे गाणं त्याला चांगलंच भोवलं आहे. त्याने जिथे शो केला त्याची तोडफोड करण्यात आली. त्याचबरोबरीने कार्यकर्त्यांनी त्याचा स्टुडिओही उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला. इथवरच हे प्रकरण थांबलं नाही. कुणाल विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. राजकीय क्षेत्रातील मंडळींनी तर “कुणाल भेटेल तिथे त्याला मारु, त्याच्या तोंडाला काळं फासू” अशा तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. संपूर्ण प्रकरण तापलं असताना कुणालने माफी मागणारच नसल्याचं सांगितलं. तर एकनाथ शिंदेंनीही संपूर्ण प्रकरणाबाबत आपलं मत मांडलं आहे. (Kunal Kamra Eknath Shinde)
कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार
“माझा नंबर लीक करुन काही लोक मला सतत फोन करत आहेत. अनोळखी फोन माझ्या व्हॉईस मेलवर येत आहेत. मी जे बोलले तेच आधी अजित पवार एकनाथ शिंदेंना बोलले होते. मी माफी मागणार नाही. मला या जमावाची भीती वाटत नाही. कोणत्याही कायदेशीर कारवाईला मी सामोरं जाईन. पोलिसांनाही सहकार्य करेन. माझ्या विनोदाने संतप्त होऊन तोडफोड करणं योग्य असेल तर, हॅबिटॅट हॉटेलवर हातोडा मारण्यापूर्वी पूर्वसुचना का दिली नाही?. यांच्याविरुद्ध समान कायदा लागू केला जाईल का?”. कुणालने चार पानी पोस्ट लिहित स्वतःची बाजू मांडली आहे.
आणखी वाचा – कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केलेलं गाणं नक्की कोणतं?, वाद का पेटला?, असे काही शब्द वापरले की…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“आरोपावर मी कधीच प्रतिक्रिया देत नाही. अडीच वर्ष सातत्याने माझ्यावर लोक आरोप करत होते. सत्ता स्थापन झाल्यापासून हे सुरु होतं. मी नेहमी सांगायचो आरोपाला मी कामाने उत्तर देणार. आरोपाला आपण आरोपाने उत्तर द्यायला लागलो की, आपलं लक्ष विचलित होतं. आरोपाला कामाने उत्तर दिलं म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला पुन्हा एकदा निवडून दिलं. पक्ष चोरला, धनुष्यबान चोरला, गद्दारी केली असे आरोप आमच्यावर जे करायचे मग खरा गद्दार कोण?. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठिक आहे. पण त्याचा गैरफायदा घेणं चुकीचं”.
“सुपारी घेऊन त्याने हे काम केलं. मी प्रतिक्रिया दिलीच नाही. मी दुर्लक्ष केलं. पण कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण याच माणासाने सुप्रिम कोर्टचे चीफ जस्टीस यांच्याबद्दलही वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सितारमण यांच्याबद्दलही त्याने काय बोललं आहे बघा. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून कोणाची तरी सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत”. अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान कुणालचे फेक ऑडिओ क्लिपही सर्वत्र व्हायरल होत आहेत. कुणालने माफी मागण्यास नकार दिल्यानंतर हे प्रकरण आता आणखी काय नवं वळण घेणार हे पाहावं लागेल.