मनोरंजन सृष्टीतील काही महत्त्वाच्या पुरस्कार सोहळ्यांमधील दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. बॉलिवूडसह मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या सिनेजगतातली अनेक कलाकार मंडळी या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यावर बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, रणबीर कपूर व बॉबी देओल यांसह अनेक कलाकारांनी आपली मोहोर उमटवली.
काल (२० फेब्रुवारी) रोजी मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये झालेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यात ‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक एटली त्याची पत्नी प्रियाबरोबर आला होता. या पुरस्कार सोहळ्यात बॉबी देओल, शाहिद कपूर, करिना कपूर, शाहरुख खान, राणी मुखर्जीसह अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. बॉलिवूडचा किंगखान शाहरुखने ‘जवान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या विजेतेपदावर त्याचे नाव कोरले, तर अभिनेत्री नयनताराने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या विजेतेपद आपले पटकावले.
दादासाहेब फाळके पुरस्कार आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२४ मध्ये कोणाला कोणता पुरस्कार मिळाला हे जाणून घ्या.
सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरुख खान (जवान)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नयनतारा (जवान)
सर्वोत्कृष्ट खलनायक – बॉबी देओल (अॅनिमल)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संदीप रेड्डी वांगा (अॅनिमल)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) – विक्की कौशल (सॅम बहादुर)
२०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी अधिकच खास होते. गेल्या वर्षात शाहरुख खानचे जवान, पंथाम व डंकी असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. यापैकी डंकी चित्रपट सोडल्यास जवान व पठाण या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटांना चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली तर रणबीर कपूरसाठीही गेले वर्ष खूपच खास होते. रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. या चित्रपटाने जवळपास ९०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. यात बॉबी देओलच्या खलनायकाच्या भूमिकेनेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२४ हा पुरस्कार सोहळा झी-५ या ओटीटी माध्यमावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.