‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे लाखो चाहते दिवाने आहेत. आजवर या कार्यक्रमाला अनेकांची पसंती पाहायला मिळाली. वेगवेगळ्या विषयांवर विनोदी पद्धतीने केलं जाणारं सादरीकरण हे प्रेक्षकांच्या देखील चांगलंच पसंतीस उतरलेलं पाहायला मिळतं आहे. कोरोना काळात देखील प्रेक्षकांना हास्यजत्रा हे मनोरंजनाचं एक उत्तम साधन होतं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अनेक कलाकार गेल्या अनेक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. (Maharashtrachi Hasyajatra Fan Moment)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात कलाकारांच्या यादीत समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, अरुण कदम, प्रभाकर मोरे, गौरव मोरे, शिवली परब, यांसह अन्य कलाकारांचा देखील समावेश आहे. हास्यजत्रेत या कलाकारांनी केलेली धमाल साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. अनेक चाहते असेही आहेत की, ज्यांना महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहिल्याशिवाय घासही उतरत नाही. तर अनेकजण कामावरुन, थकून भागून आल्यानंतर मूड फ्रेश करण्यासाठी हास्यजत्रा आवर्जून पाहतात.
तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे असे बरेच चाहते आहेत जे काम करतानाही हास्यजत्रा पाहतात. नुकतीच हास्यजत्रेतील कलाकार प्रियदर्शनी इंदलकरने हास्यजत्रेच्या एका चाहतीची स्टोरी पोस्ट केली आहे. प्रियदर्शनीच्या या स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यांत प्रियदर्शनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हातगाडीवर नाश्ताचे पदार्थ विकणाऱ्या ताई, काम करता करता हास्यजत्रा पाहत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत, अभिनेत्रीने, “मनोरंजन थांबलं नाही पाहिजे”, असं म्हटलं आहे.
कामातून एक विरंगुळा म्हणून वा मूड फ्रेश राहण्यासाठी ही मंडळी हास्यजत्रेला नेहमीच प्राधान्य देताना दिसतात. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही या शोचे चाहते आहेत. परदेशातील या चाहत्यांच्या भेटीसाठी हास्यजत्रेतील कलाकार परदेश दौराही करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच हास्यजत्रेतील कलाकार सिंगापूर दौऱ्याहून परतले आहेत. सिंगापूर येथेही त्यांना त्यांच्या चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं.