विनोदाचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे दादा कोंडके. हसवून हसवून रडवणाऱ्या या विनोदवीराची आठवण आल्यावाचून राहत. प्रतिभावान, हरहुन्नरी कलाकार म्हणून या कलावंताला साऱ्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. जागतिक पातळीवर नाव कमावलेल्या या कलाकाराचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त एक खास किस्सा जाणून घेऊया आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात. (Dada Kondke Incident)
दादा कोंडके यांनी एक काळ चांगलाच गाजवला होता. दादांचे सिनेमे लागले की चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागलेच म्हणून समजायचे. दादांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अभिनेत्रींनबरोबर काम केलं. त्यातीलच एक म्हणजे मधू कांबीकर. लावणी सम्राज्ञी म्हणून मधू कांबीकर यांनी चांगलंच नाव कमावलं. मात्र २०१६मध्ये ‘लावण्यवती’ कार्यक्रमादरम्यानच त्या रंगमंचावर कोसळल्या. त्यांनतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्या अंथरुणाला खिळल्या, अशी बातमी आहे.
पाहा मधू यांच्यासोबत घडणारा मोठा अनर्थ नेमका काय होता (Dada Kondke Incident)
मधू यांनी दादा कोंडके यांच्यासोबत ‘येऊ का घरात’ या चित्रपटात काम केलं. मधू यांना चित्रपट करण्यादरम्यान मालिकांच्याही ऑफर या येत होत्या. दरम्यान मधू यांच्यासोबत एक अघटित घटना होता होता राहिली. मधू यांनी मालिकेची ऑफर देणाऱ्यांना घरी बोलावले होते. मालिकेचे कथानक ऐकून झाले व पुढील बोलणं करण्यासाठी त्या संबंधित व्यक्तींनी त्यांना बंगल्यावर येण्यास सांगितले. दरम्यान मधु यांना त्या ऑफर देणाऱ्यांपैकी एकावर संशय आला होता. पुढे काहीतरी अघटित होऊ शकते, असे त्यांना जाणवू लागले होते. त्यामुळे प्रसंगावधान राखून त्यांनी त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
मधू यांना घेऊन त्या व्यक्ती गाडीने बंगल्यावर जाण्यास निघाले. ड्रायव्हर शेजारी मधू आणि मागच्या सीटवर ते तिघे असे प्रवास करत होते. गाडी दादरच्या इथून जात असताना इथे माझी मैत्रीण राहते तिच्याकडून मला काहीतरी घ्यायचे आहे. त्यामुळे दहा-पंधरा मिनिटे इथेच थांबा, असं म्हणून मधु दादर येथील बंगल्यात गेल्या. ते दादा कोंडके यांचे घर होते.
पाहा दादा कोंडके यांनी मधू यांना का दिला धीर (Dada Kondke Incident)

या कठीण प्रसंगी आपल्याला फक्त दादा कोंडकेच वाचवू शकतात, असा त्यांना विश्वास होता. त्यामुळे त्यांनी आपल्याला आलेला संशय दादा यांच्याकडे व्यक्त केला. दादांनी सुद्धा सर्व गोष्ट शांतपणे ऐकून मधु यांना धीर दिला. त्या तिघांना मैत्रिणीने चहाला बोलावले आहे, असे खोटे बोलून आत घेऊन येण्यास सांगितले.
गाडीत बसलेल्या तिघांनी मधू यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बंगल्यात येण्यास तयार झाले. तिघेही बंगल्यात शिरताच दादा यांच्या अंगरक्षकांनी त्यांना पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर दादा यांनी सुद्धा त्यांच्या स्टाईलने त्यांच्या भाषेत तिघांनाही खडे बोल सुनावले. शेवटी तिघांनीही घाबरून आम्ही मालिका वगैरे करणार नसल्याचं कबूल केले. वेळीच प्रसंगावधान राखल्याने मधू यांच्यासोबत घडणारा मोठा अनर्थ टळला.