मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे मृणाल दुसानिस. मृणालने आजवर अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र लग्नानंतर मृणालने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला असल्याचं पाहायला मिळालं. मृणालने नीरजसह लग्नगाठ बांधली. अत्यंत साधेपणाने मृणाल व नीरज यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नानंतर मृणाल नवऱ्यासह अमेरिकेत स्थायिक झाली. (Mrunal Dusanis Lovestory)
मालिकाविश्वातून ब्रेक घेतल्यानंतर मृणालचा चाहतावर्ग तिला मिस करताना दिसला. आता मृणाल सहकुटुंब पुन्हा एकदा भारतात परतली असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतीच मृणालने सुलेखा तळवलकरच्या ‘दिल के करीब’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी मृणालने बऱ्याच दिवसांनी गप्पा मारलेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी मृणालने तिच्या व नीरजच्या लग्नाबाबत पहिल्यांदाच खुलासा केला.
मृणाल यावेळी बोलताना म्हणाली, “अमेरिकेत जाऊन मला चार वर्ष झाली. माझे मिस्टर गेली १३-१४ वर्ष अमेरिकेत काम करत आहेत. त्यामुळे लग्नानंतर मी अमेरिकेत गेले. पहिले दीड वर्ष मी खूप फिरले. आणि त्यानंतर मला बाळ झालं. बाळ झाल्यानंतर माझा सगळा वेळ बाळातच गेला. मी तिकडे रमले पण मला इकडचीही आठवण येत होती. आमचं अरेंज मॅरेज आहे. माझ्या बाबांच्या ओळखीचे एक काका आहेत. त्यांच्या ओळखीतून हे स्थळ मला आलं. अगदी पद्धतशीर असा कांदे-पोह्यांचा कार्यक्रम झाला. बघण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आम्ही एकमेकांना पसंती कळविली. लग्नाआधी आम्ही फक्त एकदाच भेटलो आणि त्यानंतर थेट लग्नात भेटलो. मला असं वाटत होतं की, आम्ही भेटावं पण त्यानंतर तो लगेच अमेरिकेत गेला. मला असं वैयक्तिकरित्या वाटलं की, हाच तो मुलगा आहे. फोन कॉल्स, स्काईप हे सुरु होतं. त्यादरम्यान आमचे विचारही जुळले”.
पुढे ती म्हणाली, “सहा महिन्यानंतर आम्ही घरी कळवलं आणि आमचं लग्न ठरलं. आणि आता मला वाटतंय की, माझा निर्णय योग्य होता. नीरज आयटी क्षेत्रात काम करतो. अमेरिकेत त्याने त्याच मास्टर पूर्ण केलं आणि तो गेली १३-१४ वर्ष तिथेच काम करत आहे. आणि आता अचानक आम्ही दोघांनी भारतात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही इथे आलो. आता त्याने कंपनी स्विच केली असून तो भारतातून काम करत आहे”.