अभिनेत्री क्रांती रेडकरने आजवर चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या कलाकारांच्या यादीत क्रांतीचं नाव आवर्जून घेतलं जातं. सोशल मीडियावरून कुटुंबियांचे किस्से, तसेच तिच्या लेकींचे अनेक किस्से ती नेहमीच सांगत असते. तसेच क्रांती तिचे पती म्हणजेच केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याबद्दलही कायम सांगताना दिसते. समीर वानखेडे यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (Kranti Redkar On Sameer Wankhede)
या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या कार्यक्रमाच्या या भागात समीर वानखेडे यांनी बऱ्याच त्यांना खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्या. दरम्यान त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने पतीबद्दल खुपणाऱ्या गोष्टींचा उलगडा केला. यावेळी तिने एक किस्सा सांगत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पाहा समीर यांनी क्रांतीची का केली होती कानउघडणी (Kranti Redkar On Sameer Wankhede)
क्रांती म्हणाली, “आमचं नवीन लग्न झालं होतं. मी गाडी घेऊन एका वनवेमध्ये घुसले होते, मला बोर्डच दिसला नव्हता. माझ्याकडून चूक झाली होती, पुढे पोलीस उभे होते. मला वाटलं ते मला पकडणार म्हणून मी समीरला फोन केला, मला वाटलं आपला नवरा एवढा मोठा ऑफिसर आहे, आपण फोन करुया असा विचार करून मी फोन केला. त्याला मी सगळं सांगितलं, मग तो म्हणाला, ‘कुठे आहेस, काय केलंय तू?’”
पुढे क्रांती म्हणाली, “मी म्हटलं, वनवेमध्ये शिरलेय मला बोर्ड दिसला नव्हता. तो म्हणाला, ‘किती दंड आहे?’ मी म्हटलं असेल १ हजार, दीड हजार मला माहीत नाही. मग तो म्हणाला, ‘दंड भर आणि तिथून निघ. अशा फालतू गोष्टींसाठी मला परत फोन नाही करायचा.’ त्या दिवसापासून आजपर्यंत मी नियमांचं पालन करून जगतेय.”
क्रांतीच्या या किस्स्यावर प्रतिक्रिया देत समीर म्हणाले की, “आपल्या देशात कायदे आहेत. तुम्ही सिग्नल मोडलंय किंवा नो एंट्रीमध्ये गेला आहात हा गुन्हा नाही, पण बेकायदेशीर आहे. म्हणून तुम्ही नियम मोडल्यावर ‘माझा नवरा अॅडिशनल कमिश्नर आहे किंवा आयआरएस अधिकारी आहे हे सांगणं योग्य वाटत नाही.’ मी कधी टोल नाक्यावर जातो, तर ओळखपत्र दाखवत नाही. फक्त १००-१५० रुपयांसाठी मी भारत सरकारचं माझं आयकार्डचं नाव खराब करणं मला बरोबर वाटत नाही.”

पुढे ते म्हणाले, “मी टोल भरतो आणि जातो. कशाला हवाय व्हीआयपी टॅग? कोण आहात तुम्ही? कशाला माज करायचा. अखेरीस तुम्ही फक्त एक सरकारी कर्मचारी आहात. तेच मी तिला सांगितलं की माझं नाव कुठेही वापरु नकोस. मी अधिकारी आहे ते ठिक आहे. नियम मोडले असतील तर दंड भर. त्या घटनेनंतर आजपर्यंत तिने त्या कारणांसाठी मला फोन केलेला नाही.”