‘एका पेक्षा एक’ या मराठीतील लोकप्रिय डान्स शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला आणि त्यानंतर अनेक हिंदी व मराठी डान्स रिअॅलिटी शोमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून झळकलेला लोकप्रिय नृत्यकलाकार म्हणून आशिष पाटील हे नाव सर्वश्रुत आहे. आज अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये लावणी म्हटलं की आशिष पाटीलच्या नृत्यदिग्दर्शनाला प्राधान्य दिलं जातं.
सोनाली कुलकर्णीपासून ते अमृता खानविलकरपर्यंत अशा सगळ्या आघाडीच्या अभिनेत्रींना आशिषने आपल्या तालावर नाचवले आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आशिषने आजवर अनेक रिअॅलिटी शोसाठी नृत्यदिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. यासाठीच त्याला ‘लावणीकिंग’ म्हणून ओळखलं जातं. आतापर्यंत प्रचंड मेहनत करून आशिषने यशाचा हा पल्ला गाठला आहे आणि याच मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे.
आशिषने नुकताच त्याचा स्वत: डान्स स्टुडिओ सुरु केला असून इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत त्याने ही माहिती सर्वांना दिली आहे. या व्हिडीओखाली त्याने त्याच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “मस्कार प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आज वास्तुपूजा पार पडल्यावर मी अभिमानाने तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की, मी माझा स्वत:चा डान्स स्टुडिओ सुरू केला आहे. यामुळे माझं वर्षानुवर्षे पाहिलेलं स्वप्न अखेर सत्यात उतरलं आहे.”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “सर्व प्रकरचे डान्स क्लासेस, रील्स शूटिंग, वर्कशॉप्स आणि सर्व प्रकारच्या रिहर्सलसाठी हे नवीन स्थान निर्माण झाले आहे. त्यामुळे माझ्या या डान्स स्टुडिओची खास झलक तुम्हा सर्वांबरोबर शेअर करून मी माझा हा आनंद द्विगुणित करत आहे”. तसेच यापुढे त्याने आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे हे सारं काही शक्य झाले असं म्हणत गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं आहे.
दरम्यान, आशिषच्या या स्टुडिओचे नाव कलांगण असून गोरेगावमध्ये त्याने हा डान्स स्टुडिओ सुरू केला आहे. तसेच आशिषने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अमृता खानविलकर, प्रसाद ओक, हेमांगी कवी, सोनाली खरे, अवधूत गुप्ते, समृद्धी केळकर, सौरभ चौघुले, नंदिता धुरी, आयूषी टिळक यासारख्या अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याच्या अनेक चाहत्यांनीही आशिषला या नवीन डान्स स्टुडिओसाठी कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.