काही वर्षांपूर्वी बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या धमकीनंतर सलमान खानला सुरक्षा देण्यात आली आहे. अभिनेता Y+ सुरक्षा असूनही नुकताच १४ एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान दोन अज्ञात लोकांनी अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. दोन अज्ञात लोकांनी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर हवेत तीन ते चार राऊंड गोळीबार केले.
या प्रकरणात मुंबई पोलिसांना गोळीबार करणाऱ्या दोन अज्ञात आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच आज (१६ एप्रिल) मंगळवार रोजी गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुज जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की गुप्ता व सुनील पाल अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत.
सलमान खानच्या घरावरील या गोळीबारानंतर अनेक स्तरातून मुंबईकरांच्या सुरक्षतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेत्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानला भेटण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गेले असून या दोघांच्या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये सलमान व एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच अभिनेत्याचे वडील सलीम खानदेखील दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांशी काही वेळ चर्चा केली.
यादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अभिनेत्याला त्याच्याबरोबर कुटुंबियांची सुरक्षा वाढवण्याचे आणि महाराष्ट्रात अंडरवर्ल्डच्या कोणत्याही कारवाया खपवून घेणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, सलमान खानच्या घरावरील या अचानक झालेल्या गोळीबारामुळे त्याच्या कुटुंबियांसह त्याच्या अनेक चाहतेमंडळींना त्याच्याविषयी काळजी वाटत आहे. त्याच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर कलाविश्वासह त्याच्या कुटुंबियांनी व अनेक राजकीय लोकांनी त्याची भेट घेतली. अशातच आता मुख्यमंत्रीदेखील त्याच्या घरी पोहोचले आहेत.