झी मराठी वरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशल हा उत्तम अभिनेता तर आहेच, पण अभिनयाबरोबरच तो एक चांगला लेखकही आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. याचं कारण सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो कधी त्याच्या आयुष्यातील दैनंदिन अपडेट देत असतो, तसंच त्याच्या आगामी प्रोजेक्ट बद्दलही माहिती देत असतो. अशातच त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्याची ही पोस्ट सध्या खूपच चर्चेत आहे. (Kushal Badrike On Instagram)
कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याने नुकतंच एक फोटोशूट केलं असून यातील काही खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आणि हे फोटो शेअर करत त्याने या फोटोंना साजेशी पोस्टदेखील लिहिली आहे. त्याच्या या पोस्टमुळे त्याने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. कुशलने या पोस्टद्वारे त्याच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.
कुशलने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “ही पोस्ट सत्य घटनेवर आधारित आहे. माझ्या लग्नाला तसा माझ्या सासरकडून विरोध होता आणि माझं दिसणं याला कारणीभूत होतं असं मला कायम वाटत राहिलं. आता हे फोटो हाती लागेपर्यंत मी ह्याच ‘गैरसमजुतीत’ होतो. हे फोटो मला मिळाले त्या क्षणी मी सुनयनाकडे गेलो आणि फोटो दाखवून तिला म्हणालो “ह्या मुलाला तुम्ही नाकारल होतं, ह्या अश्या दिसणाऱ्या मुलाला नाकारण्याची तुमची हिंमत झालीच कशी” ? सुनयना मला शांतपणे म्हणाली की, “तू अजूनही तसाच दिसतोस, हल्ली कॅमेरे बऱ्या क्वालिटीचे आलेत.” मग मी आरशात एकदा स्वतःला पाहिलं आणि माझा ‘गैरसमज’ दूर झाला! खरच, तंत्रज्ञानामुळे किती प्रगती झाली आहे यार, बाजारात कॅमेरे चांगले आलेत.”
दरम्यान त्याच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टखाली कमेंट्समध्ये अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गायक, संगीतकार सलील कुलकर्णी, अभिनेता संतोष जुवेकर, शिवाली परब यांसारख्या अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे तर चाहत्यांनीदेखील या पोस्टला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.