ज्येष्ठ अभिनेते रमेश देव व अभिनेत्री सीमा देव यांनी आजवर सिनेसृष्टीत बरेच काम केले आहे. आई-वडिलांच्या पाठोपाठ अभिनेते अजिंक्य देव यांनीही हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं २४ ऑगस्टला निधन झालं. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. गेल्या काही वर्षांपासून त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासलं होतं. २०२० पासून त्यांना या आजाराने ग्रासलं होतं. आईच्या निधनाच्या बातमीनंतर अजिंक्य देव भावुक झालेले पाहायला मिळाले. (Ajinkya deo On Seema Deo)
आईच्या निधनानंतर अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. आई-मुलाचं अगदी घट्ट नातं होतं, त्यामुळे आईच्या निधनानंतर अजिंक्य देव अधिक दुखी असलेले पाहायला मिळाले. ‘ती होती आणि आता ती नाही,’ असं लिहित अजिंक्य यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत ते खाली मान घालून एकटक पाहताना दिसले.
अजिंक्य यांनी आई वडिलांबरोबर घालवलेल्या खास क्षणांबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. अजिंक्य यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टी, चित्रपटसृष्टीतला प्रवास तसेच त्याच्या आई-वडिलांबरोबर घालवलेल्या आठवणीतल्या क्षणांबद्दल भाष्य केलं. आईबरोबर घालवलेल्या क्षणांबाबत बोलताना ते म्हणाले की, “आई-बाबांबरोबरचे सगळेच प्रसंग खूप छान होते, त्यातून एखादा प्रसंग निवडणं कठीण आहे. आईला अल्झायमर हा आजार झाला. ज्या बाईने आमच्यावर, तिच्या चाहत्यांवर आणि सगळ्यांवरच प्रेम केलं. तिला का विस्मृती व्हावी हा प्रश्न मला कायम पडतो. नंतर नंतर तर ती सगळंच विसरली होती” असंही ते म्हणाले.
यापुढे बोलताना ते म्हणाले, “शेवटच्या दोन अडीच वर्षात तिच्याबरोबर मी जो काही वेळ घालवला तो मी कधीच विसरू शकत नाही. मी हा काळ बराच तिच्याबरोबर घालवला.तेव्हा असं वाटलं की, आम्ही बरंच काही करू शकलो असतो, आम्ही केलं नाही, ही आमची चूकचं झाली. आणि हे आमच्यासाठी फार दुःखद होतं” असं अजिंक्य देव म्हणत भावुक झाले.