अनेक कलाकार त्यांच्या अभिनयाने, लिखाणाने नेहमी प्रेक्षकांसमोर व्यक्त होत असतात. या कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घरोघरी पोहचलेला कुशल बद्रिके आज एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या विनोदाचं जबरदस्त टायमिंग, हटके विनोद शैली त्याला इतर कलाकारांपेक्षा वेगळं ठरवते. कुशल अभिनयासह सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय असून चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असतो. (Kushal Badrike Emotional Post Viral)
कुशलने पोस्ट केलेल्या फोटोंवरील कॅप्शन्स चाहत्यांचं चांगलंच लक्ष वेधून घेतात. कुशलची आयुष्यातील नाती संबंधांबाबत भाष्य करणारी आणखी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. कुशलने त्याचे काही फोटो पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहिलंय “कधी कधी आपल्या आयुष्यातून निघून गेलेली माणसं पुन्हा भेटावीत असं वाटत राहतं, पुढे निघून गेलेल्यांना हाक मारुन थांबवावसं वाटतं आणि मागे राहिलेल्यांसाठी इथे सावलीत थोडा वेळ थांबावसं वाटतं. पण हे फक्त आपल्यालाच वाटत असेल तर… ? “एखादं नातं तेंव्हाच टिकतं जेंव्हा त्या नात्यातील दोन्ही व्यक्तींना एकमेकांविषयी समान भावना असतात”, म्हणून आपण चालत राहतो एखाद्याची हाक ऐकू येई पर्यंत आणि एखादा कुणीतरी सावलीत वाट बघताना दिसे पर्यंत.”
आपल्या आयुष्यत असलेलं नात्यांचं महत्व सांगणारी ही कुशलची पोस्ट चाहत्यांच्यादेखील पसंतीस उतरलेली दिसते. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत कुशलच्या लूकचं आणि कॅप्शनचं देखील कौतुक केलं आहे. एका चाहत्याने “उत्तम विचार आणि सत्य परिस्थती” असं म्हणत कुशलच्या पोस्टचं कौतुक केलं आहे तर दुसऱ्या चाहत्याने “नात्यांमधला विश्वास आणि प्रेम खूप पक्कं असावं तर ते टिकतं” असं म्हणत कुशलच्या कॅप्शनला दुजोरा दिला आहे. (Kushal Badrike Emotional Post Viral)
कुशल बद्रिकेने अनेक मराठी चित्रपट, चला हवा येऊ द्या, वेबसिरीज यांमध्ये अभिनय साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तसेच कुशलचा एक हिंदी कॉमेडी शो देखील चांगलाच चर्चेत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने सध्या प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही हे कलाकार पुन्हा कधी प्रेक्षकांसमोर येणार या बाबत चाहते उत्सुक दिसत आहेत.