नाटक या कलेबाबत जनजागृती करण्यासाठी २७ मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. अभिनितकला माध्यमातील सर्व सामाजिक घटक व देश एकत्र यावेत आणि त्यांची एखादी संघटना उभारली जावी, असा ठराव दिनांक २७ मार्च १९६१ रोजी ‘थिएटर ऑफ नेशन’ या संकल्पनेद्वारे युनेस्कोमध्ये मांडण्यात आला. प्रत्येक कलाकार हा दिवस उत्सवासारखा साजरा करतो. अशातच मराठी सुप्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांनी देखील हा दिवस एका वेगळ्याप्रकारे साजरा केला आहे. (Pravin Tarde Video)
जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधत प्रवीण तरडेंनी लंडनमधून एक व्हिडीओ शेअर केला. या दिवसासाठी त्यांनी खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये असं पाहायला मिळत आहे की, त्यांनी जगप्रसिद्ध लेखक व नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या घराला भेट दिली आहे. त्यांच्या घराबाहेर उभं राहून काढलेला एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.
प्रवीण तरडे या व्हिडीओमध्ये म्हणतात, “हे विल्यम शेक्सपिअर यांचं घर, संपूर्ण घर पाहताना एक वेगळाच आनंद झाला. त्यांचं सगळं घर पाहून मी बाहेर आलो आणि एका गोष्टीवर माझी नजर गेली. अर्थात ती गोष्ट पाहून माझा आनंद द्विगुणित झाला. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशी ही गोष्ट म्हणजे आपले रवींद्रनाथ टागोर यांचा ब्रांझ धातूतला पुतळा विल्यम शेक्सपिअरच्या घरात लावलेला आहे”.
पुढे ते असंही म्हणाले आहेत की, “हा पुतळा पाहून आपले भारतीय लेखक, साहित्यकार, नाटककार किती मोठे होते याची प्रचिती आपल्याला येते. खरंच ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे”, असं प्रवीण तरडेंनी या व्हिडीओद्वारे सांगितलं. प्रवीण तरडे यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रवीण तरडे यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या ते ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यस्त आहेत.