प्रेम नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर वयानुसार, अनुभवानुसार प्रत्येकाला मिळतं. प्रेमाची परिभाषा ते केल्यावरच उमगते असं काव्यात्मक बोलणाऱ्या कित्येक व्यक्ती आपण पाहतो, ऐकतो. पण खरं प्रेम काय असतं? हे खरंच बरोबरच्या व्यक्तीबरोबर जगताना कळतं. वाईट प्रसंग, काळ, वेळ यामध्ये साथ देणारी व्यक्ती काहीजणांसाठी खरं प्रेम असते. तर काहींना फक्त एखाद्या व्यक्तीचं असणंच खरं प्रेम वाटतं. प्रत्येक व्यक्तीगणिक प्रेमाची व्याख्या बदलत असते. नवरा व बायकोचं प्रेम तर त्याहूनही वेगळं. चढ-उतारांमध्ये संसाराची दोन्ही चाकं योग्य दिशेने वाट शोधत असतील तर सगळं कसं सुखकर होतं. याचंच दर्शन घडवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. (handicap couple love story)
रोहन मांजरे नावाच्या मुलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोहनने इलेक्ट्रीक शॉकमध्ये त्याचे दोन्ही हात गमावले. या अपघातानंतर आयुष्यात पुढे काय होणार? या काहीच पुसटशी कल्पनाही नव्हती. दोन्ही हात नसताना काम कसं करणार?, आयुष्य कोणतं नवीन वळण घेणार? असे अनेक प्रश्न रोहनला पडले असावेत. मात्र तो या अपघातानंतर खचला नाही. हिंमतीने उभा राहिला. प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचं त्याने ठरवलं.
भावुक व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहनच्या जोडीदाराने त्याची साथ कधीच सोडली नाही. त्याची गर्लफ्रेंड म्हणजे आताची त्याची पत्नी सेजलने खंबीर साथ दिली. सात वर्षांचं रिलेशनशिप होतं. अपघातानंतर तिने रोहनच्या पाठिशी उभं राहण्याचं ठरवलं. कुटुंबियांना लग्नासाठी तयार केलं. मात्र आता आपला जोडीदार अपंगत्वाला सामोरं जात आहे, दुसरा विचार करु का? असा विचारही तिच्या मनात आला नाही. त्यांचं अगदी थाटामाटात लग्न झालं. यावेळी गृहप्रवेशदरम्यान रोहनने घेतलेला उखाणा तर डोळ्यात पाणी आणणारा होता.
आणखी वाचा – वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”
रोहन उखाणा घेतला की, “इलेक्ट्रीक शॉकमध्ये मी गमावले माझे दोन्ही हात, वाईट वेळ पाहून तिने कधीच सोडली नाही माझी साथ. सात वर्षांचं आमचं प्रेम, त्यात अनेक संकटं आली, विठ्ठलाच्या कृपेने आम्ही सगळ्या संकटांवर मात केली, अपंगत्व पाहून माझं तिच्या घरच्यांनी नाकारलं, पण तिने प्रेम माझं स्वीकारलं, आजच्या या कलियुगात मी खरंच नशिबवान आहे, घरचं ऐकत नाहीत म्हणणाऱ्यांसाठी सेजल एक उदाहरण आहे”. खरं तर कित्येक मुली घरातील ऐकत नाहीत म्हणून जोडीदाराला नाकारुन मोकळं होतात. पण या व्हिडीओद्वारे रोहन व सेजलच्या लव्हस्टोरीने एक नवी शिकवण सगळ्यांना दिली आहे.





