श्रेया घोषाल ही बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. प्रत्येकजण तिच्या आवाजाचे वेडे आहेत. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांमध्ये श्रेयाच्या नावाचा समावेश होतो. श्रेया केवळ तिच्या आवाजासाठी नव्हे तर तिचं विनम्र वागणं, तिच मधुर हास्य आणि सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. अशीही स्वत: लोकप्रिय असलेली गायिका नुकत्याच एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती आणि ही लाईव्ह कॉन्सर्ट होती ‘कोल्ड प्ले’ची. रविवारी रात्री मुंबईत कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या दुसऱ्या दिवशी गायिका श्रेया घोषाल पती आणि वडिलांबरोबर पोहोचली. याचे काही खास क्षण तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (shreya ghoshal coldplay live concert)
श्रेयाने कॉन्सर्टमधील अनेक फोटो व व्हिडिओ पोस्ट केले आहे. यावेळी तिने कोल्डप्लेच्या ‘अ स्काय फुल ऑफ स्टार्स’, ‘फिक्स यू’ आणि ‘पॅराडाइज’ या गाण्यांचा आनंद लुटला. हे खास क्षण शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “कोल्ड प्ले वर निव्वळ प्रेम. ख्रिस मार्टिन आणि त्याच्या बँडची माझी दुसरी मैफिल! आणि तुम्ही मुंबईत तुमची जादू चालू केली. हा एक नेत्रदीपक अनुभव होता. फिक्स यू साठी माझे अश्रू आवरता आले नाहीत”.
यापुढे तिने असं म्हटलं की, माझे ७० वर्षांचे वडील यांना मैफल खूप आवडली! शिलादित्यला आमच्या सर्व आठवणी पुन्हा ताज्या केल्याबद्दल धन्यवाद”. या कोल्ड प्लेच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गायिका श्रेया घोषाल अगदी तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. या सांगीतिक सोहळ्याचा तिने अगदी मनमुराद आनंद लुटला. यावेळी तिने त्यांच्या सुरात सुर मिसळले. शिवाय अगदी बेभान होऊन नाचलीदेखील. तिची ही दुसरी बाजू चाहत्यांनाही भलतीच आवडली आहे.
श्रेयाने शेअर केलेल्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, एकाने म्हटले की, “लोक कोल्ड प्लेच्या सांगीतिक मैफिलीचा आनंद घेतात हे पाहून बरं वाटलं” तर आणखी एकाने म्हटलं की, ओएमजी क्वीन, हे शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद”. तसंच आणखी एकाने “मला आशा आहे की कोल्डप्लेला माहित असेल की महान श्रेया घोषाल त्यांच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती”. असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “अरे! तुझी ही बाजू पाहून मन प्रसन्न झाले”. असं म्हटलं आहे.