Saif Ali Khan Attacked : अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला हे प्रकरण आता अधिक चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात घुसून अभिनेत्यावर चाकूने वार केला. यादरम्यान अभिनेता गंभीर जखमी झाला असून तो लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहे. अथक प्रयत्नानंतर अखेर मुंबई पोलीस पथकाला गुन्हेगाराला अटक करण्यात यश मिळालं आहे. अखेर गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. ३० वर्षीय आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल ऊर्फ विजय दास असे आहे. आरोपी हा मूळचा बांग्लादेशचा आहे. बांग्लादेशला परत जाण्यासाठी त्याला पैशांची गरज होती म्हणून त्याने चोरी केली असल्याचं समोर आलं आहे. आरोपीबाबत आणखी अपडेट त्याच्या मित्रांकडून मिळाली आहे.
आरोपीच्या मित्राने इंडियन एक्सप्रेसला दिलेला मुलाखतीत असं म्हटलं की, “तो इतका मोठा गुन्हा करु शकतो याची कल्पनाही आम्ही केली नव्हती”. आरोपीचा मित्र रोहमत खान म्हणाला, “मी सैफ अली खानवरील हल्ल्याच्या बातम्या वाचत होतो, एवढ्या हायप्रोफाईल व्यक्तीच्या घरात घुसून कोण हल्ला करेल, असा प्रश्न मला पडला होता. जेवढं मी त्याला ओळखतो, त्यावरुन तो इतका मोठा गुन्हा करेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं”, असं तो म्हणाला.
आणखी वाचा – दारूचं व्यसन, दोन घटस्फोट अन्…; ‘बिग बॉस १८’चा विजेता करणवीर मेहरावर ओढवलेला वाईट काळ, घडलं होतं असं की…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरीफुल इस्लाम सज्जाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर बांगलादेशातील झलोकाठी जिल्ह्यातील राजाबरिया गावचा आहे. त्याने आपली खरी ओळख लपवण्यासाठी विजय दास या नावाचा वापर केला. “आरोपीला एका कंत्राटदारामार्फत काम मिळालं होतं. तो हॉटेल ब्लॅबर ऑल डेच्या ठाण्यातील शाखेत हाऊसकीपिंग विभागात काम करायचा, तर मी कॅफेटेरियामध्ये काम करायचो. तो दयाळू माणूस वाटत होता. त्याने कधीही कोणाशीही वाद किंवा भांडण केलं नव्हतं, तो त्याचं काम चांगलं करायचा,” असंही रोहमत म्हणाला.
“तो कधीही त्याच्या भूतकाळाबद्दल, कुटुंबाबद्दल किंवा त्याच्या बांगलादेश संबंधांबद्दल बोलला नव्हता. मी डिसेंबरमध्ये हॉटेलमधील काम सोडले आणि त्याने माझ्याआधी काम सोडले होते”, असंही आरोपीचा मित्र रोहमतने नमूद केलं. तर आरोपी ज्या ठिकाणी काम करत होता, त्या हॉटेलचे जनरल मॅनेजर नेल्सन सलधाना यांनी म्हटले की, “तो बिजॉय दास या नावाने त्या हाऊसकीपिंग टीमचा एक भाग म्हणून आमच्याकडे कामावर आला होता. त्याला थर्ड पार्टी कंत्राटदाराने कामावर घेतलं होतं. त्याची वागणूक सभ्य होती, तो आमच्याकडे काम करत असताना आम्हाला त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती”. कंत्राटदाराकडे त्याला कामावर ठेवल्याची कागदपत्रे आहेत. तसेच रेस्टॉरंटकडे त्याच्या आधार आणि पॅन कार्डच्या कॉपी आहेत, त्यावर त्याचं नाव विजय दास असे आहे.