बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली. प्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमियाचे वडील आणि प्रसिद्ध संगीतकार विपिन रेशमिया यांच्यावर आज (१९ सप्टेंबर) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी ते ८७ वर्षांचे होते. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विपिन रेशमिया यांच्या धीरूभाई रुग्णालयात उपचार सुरू होते. वाढतं वय आणि आजारपणाशी ते गेल्या काही काळापासून झुंजत होते. अखेर बुधवारी त्यांचं निधन झालं. वडिलांच्या जाण्यामुळे हिमेश रेशमियावर दु:खाचा डोंगर कोसळला असून बॉलीवूडमधून हळहळ व्यक्त होत आहे. तसंच सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. (himesh reshammiya fater funeral)
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार विपिन यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. त्यांच्यावर उपचारदेखील चालू होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्यावर जुहू येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळचा हिमेशचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हिमेश अंत्यसंस्कार करुन बाहेर येताना दिसत आहे. यावेळी तो पूर्णपणे कोलमडलेला दिसून येत आहे. वडिलांच्या जाण्याचे दु:ख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्याच्या वडिलांना निरोप देण्यासाठी मनोरंजन सृष्टीतील फराह खान, साजिद खान, युलिया वांतूर, शान असे अनेक कलाकार उपस्थित राहिलेले दिसले. तसेच उपस्थित असणाऱ्यांनी त्याला धीरदेखील दिला. हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
विपिन हे हिमेशचे वडीलच नव्हते तर त्याचे गुरुही होते. तसेच सलमान खानच्या चित्रपटातही विपिन यांनी संगीत दिले आहे. यादरम्यान त्यांची भेट हिमेश रेशमियाशी झाली. यानंतर सलमानने हिमेशला त्याच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटासाठी संधी दिली. त्याच प्रमाणे विपिन यांनी ‘द एक्सपोज’ (२०१४) आणि ‘तेरा सुरूर’ (२०१६) या चित्रपटांची निर्मिती केली होती. तसेच हिमेशच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्याने आजवर अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले असून अभिनेता म्हणूनदेखील तो प्रेक्षकांच्या समोर आला आहे.