सध्या बॉलिवूड व पंजाबी रॅपर हनी सिंह त्याच्या जबरदस्त कमबॅकमुळे अधिक चर्चेत आहे. नुकतीच त्याची डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये त्याने खासगी आयुष्याबद्दल प्रत्येक गोष्टीचा खुलासा केला आहे. यामध्ये त्याने करियर, बायपोलर डिसॉर्डर व शाहरुख खानबरोबर असलेल्या वादाबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. या सगळ्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढलेली दिसून येत आहे. मात्र शाहरुख व हनी यांचा नक्की काय वाद होता? तसेच नक्की काय झाले होते? याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तसेच या डॉक्युमेंट्रीमध्ये अजून कोणत्या गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे? त्याबद्दलही थोडक्यात जाणून घेऊया. (yoyo honey singh on shahrukh khan)
शाहरुख व हनी यांचे ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटातील ‘लुंगी डान्स’ हे गाणं अधिक लोकप्रिय ठरलं. आजही प्रेक्षक त्या गाण्याचे चाहते आहेत. मात्र एक वेळ अशी आली की या दोघांमध्ये मोठे वाद झालेले. याबद्दल हनीने आता भाष्य केले आहे. ‘यो यो हनी सिंह : फेमस’ या डॉक्युमेंट्रीमध्ये हनीने शाहरुखने त्याला मारल्याची अफवा असल्याचे सांगितले आहे. या अफवांमुळे खूप त्रास होत असल्याचेही त्याने सांगितले. याबद्दल हनी म्हणाला की, “शाहरुखने मला कानाखाली मारली अशी कोणीतरी अफवा पसरवली. तो माणूस माझ्यावर खूप प्रेम करतो. तो कधीही माझ्यावर हात नाही उचलणार. जेव्हा मला एका शोसाठी शिकागोला घेऊन गेला तेव्हा मी म्हणालो की मला परफॉर्म करायचा नाही. मला माहीत होतं की त्या शोच्या दरम्यान माझा मृत्यू होईल. सगळ्यांनी मला सांगितले की मी तयार झालं पाहिजे”.
पुढे तो म्हणाला की, “माझा मॅनेजर माझ्याकडे आला आणि म्हणाला की तू तयार का नाही होत आहेस? त्यावेळी मी म्हणालो की मला जायचे नाही. मी बाथरुममध्ये गेलो आणि ट्रिमरने सगळे केस कापले. नंतर मी म्हणालो की आता मी कसा परफॉर्म करणार? ते म्हणाले की टोपी घाल आणि परफॉर्म कर. नंतर मी तिथे खुर्चीवर बसलो. तिथे बाजूलाच एक कॉफी मग होता. तो मी उचलला आणि स्वतःच्या डोक्यावर मारुन घेतला. त्यावेळी मला टाकेदेखील पडले होते”.
‘ब्रॉउन रंग’, ‘देसी कलाकार’, ‘सनी सनी’, ‘ब्ल्यू आईज्’, ‘मनाली ट्रान्स’ अशा अनेक लोकप्रिय गाण्यांनी हनी सिंहने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. मात्र गेले अनेक वर्ष तो मनोरंजन क्षेत्रापासून दूर होता. त्याचे आता कमबॅक झालेलं दिसून येत आहे.