बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी आपल्या स्वकतृत्वावर चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्या अभिनेत्यांमध्ये रणवीर सिंग हे नाव आवर्जुन घेतलं जातं. रणवीरने २०१०मध्ये ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या चित्रपटात त्याच्याबरोबर अनुष्का शर्माही होती. त्यानंतर त्याने बरेच चित्रपट केले. त्याचा आतापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. या सगळ्यात त्याचे बरेच चित्रपट हीट झाले तर काही फ्लॉपही झाले. याबद्दल त्याने भाष्य केलं आहे. नुकतीच ‘कॉफी विथ करण’ या शोच्या पहिल्या भागात रणवीरने हजेरी लावली. त्यावेळी त्याने त्याचे सलग तीन चित्रपट फ्लॉप गेले होते त्या काळाबद्दल भाष्य केलं आहे. (Ranveer singh on 3 flop movies in a row)
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या सेलिब्रिटी चॅट शोच्या ८ व्या सीझनला सुरुवात झाली आहे. याच्या पहिल्याच भागात रणवीर सिंह व दीपिका पदुकोणने हजेरी लावली. पहिल्यांदाच ते दोघं या शोला एकत्र आले होते. यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. या सगळ्याबद्दल बोलताना रणवीरने त्याच्या सलग तीन चित्रपटांच्या अयशस्वीतेबद्दल भाष्य केलं. .यावेळी रणवीर म्हणाला, “मी या काळात खूप त्रास सहन केला आहे. विशेषतः २०२२मधील ‘सर्कस’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर बरंच झेललं आहे”.

रणवीर पुढे सांगतो, “चला मी पुन्हा तुम्हाला महामारीच्या त्या काळाकडे घेऊन जातो. साथीच्या या आजारातून बाहेर पडताना, माझ्याकडे ‘८३’ (२०२१) हा छान चित्रपट होता. ज्याला सगळ्यांनी पुरेपूर प्रेम दिलं. हा चित्रपट फक्त चुकीच्या वेळी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित होण्याच्या ४८ तास आधी आम्ही बाजारपेठ गमावली होती. कारण ओमिक्रॉनमुळे सगळं बंद झालं. त्यामुळ दुर्भाग्याने एका चांगल्या चित्रपटाला खराब कामगिरीचा कलंक लागला”.

या चित्रपटानंतर रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. याबद्दल बोलताना रणवीर म्हणाला, “‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट खूप छान व चांगल्या हेतूचा चित्रपट होता पण करोना माहामारीनंतर प्रदर्शित झाल्यामुळे तो आपटला”. त्यानंतर ‘सर्कस’ चित्रपटाबाबत बोलताना तो म्हणाला, “‘सर्कस’ चित्रपटात माझी भूमिका व जबाबदारी अगदी सीमित होती. त्यामुळे याचा पूर्णपणे दोष मी स्वतःला देऊ शकत नाही. मी सलग तीन मोठे चित्रपट फ्लॉप होताना कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे माझ्यासाठी हा धक्का खूपच नवीन होता”. रणवीरने या काळात खूप त्रास सहन केला होता असं स्पष्ट केलं पण आता तो खूप आनंदी आहे हे पण तो म्हणाला.