बॉलिवूडसह मराठी कलाविश्व गाजवणारी लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख. बॉलिवूडसह मराठीमधील एक आदर्श जोडपं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तसेच त्यांच्यातील नवरा-बायकोचा बॉण्ड हा खास असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. मनोरंजन सृष्टीत कायम चर्चेत असणारी ही जोडी सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय असते. एकमेकांबरोबरचे अनेक रील-व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात आणि त्यांचे हे व्हिडीओ चाहत्यांनादेखील भलतेच आवडतात. अशातच रितेश-जिनिलिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. रितेशने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे त्यांना नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमधून त्यांनी हिंदू धर्मावर टीका केल्याच्या अनेक नकारात्मक कमेंट्स आल्या आहेत. (Riteish Deshmukh On Instagram)
रितेश-जिनिलिया यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रितेश जिनिलियाला असे म्हणतो की “राजा दशरथाला तीन बायका होत्या. म्हणजे मला अजूनही लग्न करण्यासाठी दोन संधी आहेत” यावर जिनिलिया त्याला उत्तर देत असं म्हणते की, “तू द्रौपदीचे नाव ऐकले आहेस का?” त्यांचा हा व्हिडीओ मजेशीर असला तरी अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी या व्हिडीओखाली नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.
या व्हिडीओवर, “हिंदू धर्मावर असे कॉमेडी व्हिडीओ बनवू नका सर, आम्ही तुमचा आदर करतो, रितेश व्हिडीओसाठी आपल्या देवांचा वापर करु नका आपणच आपल्या धर्माची चेष्टा करणे योग्य नाही, ही खूप पवित्र नावे आहेत आणि जर तुम्ही या नावांची खिल्ली उडवली तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील, स्वतःला सुधारा व अभिमानाने सांगा की आपण हिंदू आहोत, हिंदू धर्मावर जोक करू नकोस रितेश, यात काहीही मजेशीर नाही, तुमच्याकडून दशरथ व द्रौपदी यांचे नाव वापरून व्हिडीओ बनवण्याची अपेक्षा नाही. स्वत:च्याच धर्माला असे ट्रोल करणे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही सेलिब्रिटी आहात तुम्हाला काही तरुण आदर्श मानतात आणि तुम्ही हिंदू सनातन संस्कृतीचा अपमान करता? जर तुम्हाला हिंदू सनातन संस्कृतीचा मान राखता येत नसेल तर अपमान करण्याचा कोणताही अधिकार नाही.” अशा अनेक नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – ‘या’ आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार या नव्या वेबसीरिज व चित्रपट, पाहा संपूर्ण यादी
दरम्यान, रितेश-जिनिलिया यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचेही म्हटले आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत त्यांची पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली हसण्याच्या कमेंट्स करत त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचे असल्याचे सांगितले आहे.





