अभिनेत्री रश्मिका मंदानाने तिच्या लाघवी सौंदर्याने व निखळ हास्याने बॉलिवूडसह दक्षिण सिनेसृष्टीत तिचे स्थान निर्माण केले आहे. रश्मिका ही नॅशनल क्रश म्हणूनही ओळखली जाते. नुकत्याच आलेल्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाने तिच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली आहे. याच रश्मिकाने तिचा जीव थोडक्यात वाचवला आहे. अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत ही माहती दिली आहे.
एका विमान प्रवासादरम्यान रश्मिकाचं नशीब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला आहे. “काळ आला होता पण वेळ आली नव्हती” असं म्हणत रश्मिकाने एक फोटो पोस्ट केला आहे आणि एक मोठ्या विमान अपघातातून आपला जीव वाचला असल्याचे तिने सांगितले आहे. रश्मिकाने अभिनेत्री श्रद्धा दासबरोबर इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट करत “तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते, आज अशाप्रकारे आम्ही मरता मरता वाचलो आहोत”.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमानातील काही तांत्रिक बिघाडामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आणि याच विमानात रश्मिका, श्रद्धा दास आणि इतर प्रवासी प्रवास करत होते.
दरम्यान, रश्मिका, श्रद्धा दाससह विमानातील इतर प्रवासी सुखरूप आहेत. पण रश्मिकाने शेअर केलेल्या फोटोमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. रश्मिकाची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनीही चिंताही व्यक्त केली आहे