बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या नेहमी चर्चेत असलेल्या दिसतात. रोखठोक वक्तव्य तसेच परखड मतं यामुळे त्या नेहमी प्रकाशझोतात असलेल्या पाहायला मिळतात. त्यांचे व फोटोग्राफर्स यांच्यातील अनेक वाद-विवाद आतापर्यंत समोर आले आहेत. जया या कुठेही गेल्या आणि त्यांच्या मागे फोटोग्राफर्स दिसले की त्यांच्यावर नेहमी ओरडत असतात किंवा चिडतात. मात्र असं करण्यामागे नक्की काय कारण असावं? असा प्रश्न सगळ्यांना पडताना दिसतो. याबद्दल आता स्वतः सुप्रसिद्ध फोटोग्राफर मानव मंगलानीने भाष्य केले आहे. त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. (jaya bachachan behaviour with paparazzi)
मानवने नुकतीच अलिना डिसेक्ट्सला मुलाखत दिली, यावेळी बोलताना सांगितले की, “जया यांना माध्यमाचे इतके वेड नाही. जुन्या काळात खूप कमी लोक होते जे हे सर्व क्षण टिपायचे. पण आता माध्यमांची संख्या वाढली आहे. जेव्हा ते एखाद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी असतात तेव्हा जया यांना काहीही समस्या नसते. पण त्यांचा पाठलाग केला की जया यांना राग येतो. फक्त जेवण्यासाठी सगळे बाहेर आलो मग इतकी लोकं कशी जमा झाली? असा प्रश्नदेखील जया यांना पडतो”.
पुढे मानव यांनी सांगितले की, “जया कधी कधी फोटोग्राफर्सबरोबर मस्करीदेखील करतात. त्या फोटोचे अँगल समजावतात. असा नाही तर तसा फोटो घ्या. असंही त्या सांगताना दिसतात. त्या फक्त मोजक्या ४-५ माध्यमांना ओळखतात. त्यांचा एक वेगळाच फंडा आहे”. काही दिवसांपूर्वी जया यांनी ‘व्हॉट द हेल’ या पॉडकास्टला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी पापराजी कल्चरबद्दल भाष्य केले होते.
यावेळी त्यांनी असे सांगितले होते की, “मला फोटोग्राफर्सचा राग येतो. ते आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये हस्तक्षेप करतात आणि पोट भरतात. लाज वाटत नाही का? असा प्रश्न मी नेहमी त्यांना विचारते”. दरम्यान, जया यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्या ‘रॉकी और रानीची प्रेम कहाणी’ या चित्रपटात दिसून आल्या होत्या. त्यांनी रणवीर सिंहच्या आजीची भूमिका साकारली होती.