बिग बॉसच्या घरात कितीही राडे झाले, कितीही वाद झाले तरीही कुणालाही हिंसा करण्याची परवानगी नाही. पण आर्या व निक्कीमध्ये झालेल्या राड्याने हिंसक रुप घेतल्याचं पाहायला मिळालं. टास्कमध्ये निक्की व आर्या दोघीही आक्रमक झाल्या आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. बिग बॉसच्या घरात हिंसा न करण्याचा बिग बॉसचा मुलभूत नियम आहे. पण आर्याच्या या वागण्यामुळे बिग बॉसचा हा नियम मोडला गेला आणि यामुळे तिला आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आर्याने निक्कीला कानाखाली मारल्यानंतर तिला तातडीने जेलमध्ये टाकण्यात आले होते. (Bigg Boss Marathi 5 Aarya Jadhav Evicted)
यावेळी बिग बॉसने आर्याबद्दल अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर घेण्यात येईल असं म्हटलं होतं आणि अखेर रितेशने आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं आहे. यावेळी रितेशने आर्याला झापत असं म्हटलं की, “आर्या या आठवड्यात तुमचा एक गेम होता, समोरच्याला अडवायचं. तो तुमचा गेम होता. पण त्यावर तुमचं एक स्टेटमेंट होतं, निक्की असं वागते मग मी पण अशी वागणार. आर्या मी निक्कीला चुकीच्या वागण्यावर ओरडलो आहे आणि पूर्ण सीझनसाठी त्यांची कॅप्टन्सीदेखील काढून घेतली.
आणखी वाचा – यालाच म्हणतात संस्कार! ‘हीच आमुची प्रार्थना’ गाणं लागताच सूरजने जोडले हात, साधेपणाचं होतंय कौतुक
यापुढे रितेशने असं म्हटलं की, “मी निक्कीला तिच्या चुकीमुळे कायम ओरडलो आणि तुम्हालाही ओरडणार. आर्या तुम्ही स्वत:ला काय समजता?. तुम्हाला राग आला की तुम्ही कोणावरही हात उचलणार? हे बिग बॉसचं घर आहे. याआधीही घरात अशी स्थिती निर्माण झाली. पण तेव्हा कुणीही कुणावर हात उचलला नाही. पण मला सगळ्यात जास्त राग तुम्ही तुमची चूक मान्य नाही केली याचा आला आहे. म्हणजे थोडक्यात आर्या तुम्ही जे केलं ते शंभर टक्के जाणीवपूर्वक होतं”.
दरम्यान, भाऊच्या धक्क्यावर अंतिम निर्णय घेताना बिग बॉसने “कॅप्टन्सी कार्यातलं फुटेज वारंवार पाहिल्यानंतर लक्षात आलं की, आर्या निक्कीमध्ये धक्काबुक्की झाली. निक्कीचा आर्याला धक्का लागला आणि त्यानंतर आर्याने हात उचलला. आर्याने केलंल कृत्य बिग बॉसच्या मुलभूत नियमांचं उल्लंघन आहे. बिग बॉसच्या घरात या हिंसेचं समर्थन कधीच केलं जाणार नाही” असं म्हणत बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं आहे.