कलाकार उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. पण पडद्यामागे नक्की त्यांचं आयुष्य कसं असतं? हे जाणून घेण्यात अनेकांना उत्सुकता असते. कित्येकदा तर कलाकार चित्रपटांसाठी घेत असलेलं मानधन, त्यांची वागणूक याबाबत विविध चर्चा रंगताना दिसतात. काही कलाकारांचे खरे चेहरेही यामधून उघड झाले आहेत. आता असंच एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी कलाकारांचं खरं आयुष्य आणि त्यांच्या वाढत्या मागण्या याबाबत अगदी उघडपणे भाष्य केलं. दिवसभर शूट करुन झाल्यानंतर रात्री काही कलाकार ड्रग्ज आणून द्या म्हणून मागणी करत असल्याचंही त्यांनी अगदी बिनधास्त सांगितलं. (pahlaj nihalani on akshay kumar)
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पहलाज यांनी इंडस्ट्रीबाबत अनेक खुलासे केले. झगमगत्या दुनियेचं काळं सत्य समोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच कलाकारांच्या वाढत्या मागण्या डोक्याला ताप असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. निर्माते, दिग्दर्शक मिळून चित्रपटातील कलाकारांची कास्टिंग ठरवायचे. मात्र आता कलाकारांचा कास्टिंगमध्ये हस्तक्षेप असतो असंही पहलाज यांनी म्हटलं.
आणखी वाचा – Video : कलाकार झाले सेवेकरी! वारकऱ्यांच्या सेवेत आदेश बांदेकर दंग, पायांना मसाज केला अन्…
कास्टिंगबाबत बोलताना त्यांनी अक्षय कुमारचं उदाहरणही दिलं. ते म्हणाले, “सुरुवातीला दिग्दर्शक, निर्मातेच कास्टिंग करत होते. कधीच कलाकारांनी यामध्ये हस्तक्षेप केला नाही. माझ्याबरोबर काम करताना अक्षय कुमारने पहिल्यांदा कास्टिंगमध्ये हस्तक्षेप केला होता. २००२मध्ये त्याने ‘तलाश’ चित्रपटात काम केलं होतं. आपण उद्याच चित्रपटाच्या कामाला सुरुवात करु. तुम्ही मला जे मानधन द्याल ते मी स्वीकारने पण चित्रपटात फक्त करीना कपूरच हवी असं अक्षयने मला सांगितलं. हा चित्रपट त्यावेळेचा सगळ्यात महागडा चित्रपट होता. जवळपास २२ करोड रुपये या चित्रपटाचा बजेट होता. माझ्या करिअरमधील हा पहिलाच चित्रपट होता ज्यामध्ये एका कलाकाराने हिच अभिनेत्री हवी म्हणून मागणी केली होती”.
पुढे ते म्हणाले, “जिथे एका माणूस काम करायचा तिथे आता १० जणं काम करतात. पहिली एक व्हॅनिटीच असायची. आता कलाकार सहा सहा व्हॅनिटी व्हॅन पाहिजे अशी मागणी करतात. मीटिंग, स्वयंपाक, व्यायाम करण्यासाठी यांना वेगवेगळी व्हॅनिटी व्हॅन हवी असते. सहा व्हॅनिटी व्हॅन मागताना कलाकारांना लाज वाटली पाहिजे. आधी फक्त कलाकाराबरोबर त्याचा मेकअपमॅन असायचा. आता हेअर ड्रेसर, आरसा पकडण्यासाठी एक दुसरी व्यक्तीही आणतात. काहीही काम नसतात आमच्या हातात दीड लाखापर्यंत बिल देतात. आधी कलाकार घरचंच जेवण सेटवर आणायचे. आता यांना डाएड फुड हवं. यांना रात्री ड्रग्ज हवेत आणि सकाळी डाएट खाणं”. इंडस्ट्रीचं हे काळं सत्य खरंच धक्कादायक आहे.





