‘झेंडा’, ‘मोरया’, ‘रेगे’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘शाळा’, ‘बॉईज’ यासारख्या चित्रपटांत काम करत आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. आपल्या दमदार अभिनयाने संतोषने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह हिंदी चित्रपट व वेबसीरिजद्वारे त्याने हिंदी प्रेक्षकांचेदेखील मनोरंजन केले आहे. अशातच आता तो पुन्हा एकदा मराठीसह हिंदी प्रेक्षकांचे मनोरंबन करायला सज्ज झाला आहे.
अभिनेता संतोष जुवरकर लवकरच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘छावा’ चित्रपटातून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. याच चित्रपटाचे शूटिंग आता संपले असून याबद्दलची एक खास पोस्ट नुकतीच त्याने शेअर केली होती. संतोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे बॉलिवूड अभिनेता विकी कौशलबरोबरचा मजामस्ती करतानाचा व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने शूटिंगदरम्यानचे काही खास क्षण शेअर केले होते. अशातच आता त्याने नुकताच आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याद्वारे त्याने विकी कौशलचे कौतुक केले आहे.
विकीचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “हिंदीत खूप स्टार अभिनेते आहेत. पण खरा अभिनेता स्टार भेटला तो हा माणूस (विकी कौशल) ‘मसान’,’ उरी’, ‘उधम सिंग’, ‘सॅम बहादूर’, ‘संजु’. जिथे संधी मिळेल, तिथे त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे आणि मला माहित आहे, मी माझ्या डोळ्यांनी या मुलांची मेहनत पाहिली आहे. त्यामुळे आगामी ‘छावा’चित्रपटामुळे आता अजून एक धमाका करणार हा मुलगा. भावा तू माझा सर्वात आवडता अभिनेता आहेस आणि आता तू खूप आवडता माणूसही झाला आहेस. कायम असाच रहा. माझं तुझ्यावर खूपच प्रेम आहे.”
या व्हिडीओमध्ये विकीने संतोषबरोबर साधलेल्या संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये संतोष विकीला “मला तुमच्याबरोबर काम करुन खूप मज्जा आली” असं म्हणतो. यापुढे विकी संतोषचे कौतुक करत असं म्हणतो की, “मला संतोषजींबरोबर काम करून खूपच मज्जा आली. संतोषबरोबर काम करणे हे माझं सौभाग्य आहे. आता त्यांचं शूटिंग संपलं आहे. त्यामुळे मी घरी जाऊन आता रडणार आहे. मला संतोषची खूपच आठवण येईल”. दरम्यान, या व्हिडीओला संतोष व विकीच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.