अभिनेते सचिन पिळगांवकर व अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर ही सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडींपैकी एक जोडी आहे. या जोडीने आजवर अनेक चित्रपटातील अभिनयांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या दोन्ही कलाकारांपाठोपाठ आता त्यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगांवकरदेखील सिनेसृष्टीत पाऊल टाकत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या श्रिया ‘ब्रोकन न्यूज २’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आली आहे. मध्यंतरी श्रिया ही सुप्रिया व सचिन यांची दत्तक मुलगी असल्याच्या बातम्या येत होत्या. यावर श्रियाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Shriya Pilgaonkar On Fake News)
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत श्रियाने दत्तक मुलगी असल्याच्या व्हायरल झालेल्या बातमीवरुन तिने भाष्य केलं. यावर ती म्हणाली, “एका बातमीत कुठेतरी म्हटलं होतं की, मला दत्तक घेण्यात आलं होतं. पण तसं नाही, मी माझ्या आई-वडिलांची दत्तक मुलगी नाही. त्यांनी मला दत्तक घेतल्याची एक बातमी आली होती, पण ती पूर्णपणे खोटी बातमी आहे”.
श्रिया पुढे म्हणाली, “खरं तर मी काहीतरी स्पष्टीकरण द्यावं असाही हा विषय नाही, कारण मी माझी बाजू मांडण्यासाठी माझं जन्म प्रमाणपत्र इन्स्टाग्रामवर दाखवणार नाही आहे. पण हो, ही बातमी अजिबात खरी नसली तरी हास्यास्पद नक्कीच होती. पण याशिवाय माझ्याबद्दल इतर कोणत्याही वाईट गोष्टी लिहिल्या गेलेल्या नाहीत”.खरं तर मी या क्षणापुरत बातम्यांमध्ये राहण्याचा विचार करत नाही, तर येणाऱ्या वर्षांसाठी प्रासंगिक राहण्याचा विचार करते. त्यामुळे मी छोट्या-मोठ्या गोष्टींकडे पाहत नाही. माझ्यासाठी एक कलाकार म्हणून तुम्ही किती शिकत आहात आणि विकसित होत आहात हे महत्त्वाचं आहे.
पुढे श्रिया असंही म्हणाली, “माझे वडील ६० वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहेत आणि अजूनही ते काम करत आहेत. याचं कारण म्हणजे त्यांची सतत काहीतरी शिकण्याची जिद्द. मी वैयक्तिकरित्या कधीही बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न केला नाही किंवा प्रसिद्धी स्टंट म्हणून माझ्याबद्दल खोट्या बातम्या दिल्या नाहीत. माझ्याकडे चांगला प्रोजेक्ट असेल तर त्याबद्दल मी माध्यमांसमोर बोलू शकते पण फक्त बातम्यांमध्ये राहण्यासाठी मी माझ्याबद्दल खोटी माहिती देणार नाही”, असंही श्रिया म्हणाली.