बॉलिवूडमध्ये अनेक विविधांगी भूमिका करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे एक कलाकार म्हणजे अभिनेते शक्ती कपूर. त्यांनी आजवर गंभीर, विनोदी, नकारात्मक तसेच सकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. सध्या त्यांची ‘अॅनिमल’ चित्रपटातील भूमिकादेखील लक्षवेधी ठरत आहे. ‘अॅनिमल’मध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक आहे. अशातच त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत रणबीर कपूरचे कौतुक करत त्याचे वडील ऋषी कपूर यांच्या काही खास आठवणींना उजाळा दिला आहे.
यावेळी त्यांना “चित्रपटाला आता भरघोस यश मिळत आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटत आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत त्यांनी असे म्हटले की, “चित्रपटाला मिळणारे यश हे मला खूपच आश्चर्यचकित करणारे आहे. दिग्दर्शकाने चित्रपटाची कथा ऐकवताच चित्रपटाला यश मिळणार हे माहीत झाले होते. पण संपूर्ण जगभरातून इतका प्रतिसाद मिळेल याची अपेक्षा नव्हती.” यापुढे त्यांना “तुम्ही एकत्र कुटुंबाने मिळून हा चित्रपट बघितला आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर “श्रद्धा सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि माझी पत्नी यावेळी बाहेर आहे. त्यामुळे आम्ही अजून एकत्र चित्रपट बघितला नाही. पण लवकरच आम्ही चित्रपट बघणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा – “नवऱ्याबरोबर ‘बिग बॉस’मध्ये जाऊ नकोस”, चाहतीने सल्ला देताच सोनाली कुलकर्णीचे उत्तर, म्हणाली, “तिथे कधीच…”
यापुढे त्यांना दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दलचा एक प्रश्न विचारण्यात आला. “ऋषी कपूर व तुमचे संबंध अधिक जवळचे होते. त्यांच्याबरोबर तुमचे कौटुंबिक नाते होते, तर ऋषी कपूर व रणबीर कपूर या बापलेकाच्या नात्याबद्दल काय सांगाल?” असे विचारण्यात आले. याचे उत्तर देत ते असं म्हणाले की, “ऋषी माझ्यापेक्षा एका दिवसाने लहान होता. त्याच्या मुलाशी त्याचे नाते अगदीच छान होते. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्याच्या व माझ्या कुटुंबाचे संबंधदेखील खूपच खास होते. मुलांच्या लहानपणी आम्ही दोन्ही कुटुंबं एकत्र फिरायला जायचो. आता रणबीरने मिळवलेले हे यश पाहण्यासाठी ऋषी आता हवा होता. त्याला रणबीरचा नक्कीच अभिमान वाटला असता.”
दरम्यान, रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात शक्ती कपूर यांनीदेखील त्यांच्या अभिनयाचा वेगळाच ठसा उमटवला आहे. तसेच रणबीर हा सध्याच्या कलाकारांपैकी माझा अत्यंत आवडता अभिनेता आहे आणि त्याचा मला खूपच अभिमान आहे असं म्हणत अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.