गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड मंडळी राजकारणाकडे वळताना दिसत आहेत. अभिनेते अरुण गोविल, अभिनेत्री कंगना रणौत यांच्यानंतर आता अभिनेता संजय दत्तदेखील राजकारणात पाऊल ठेवणार अशा चर्चा सर्वत्र सुरु होत्या. लोकसभा निवडणुक २०२४ साठी हरियाणा येथून निवडणूक लढल्या जाऊ शकतात असे सर्वांना वाटत होते. यावर आता खुद्द संजयने मौन सोडले आहे. त्याने आता स्वतःच्या सोशल मीडियावरुन याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच जर राजकारणात प्रवेश केला असता तर त्याबद्दल मी स्वतः माहिती दिली असती असेही तो म्हणाला. (sanjay dutt on politics)
संजयचे वडील सुनील दत्त हे मुंबई संसदचे सदस्य व मंत्री होते. त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत संजयदेखील राजकारणात प्रवेश करेल असा अंदाज सर्वांनी बांधला. त्याच्या राजकारणातील अफवांवर त्याने स्वतः खुलासा करत लिहिले आहे की, “मी माझ्या राजकारणातील प्रवेशाबद्दलच्या सर्व अफवांवर पूर्णविराम लावत आहे. मी कोणत्याही पक्षात सहभागी होत नाही तसेच कोणतीही निवडणूक लढवणार नाही. जर मी राजकारणात प्रवेश करणार असेन तर मी स्वतः त्याबद्दलची घोषणा करेन. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका”.
संजय अभिनेता असला तरीही त्याचे राजकारणाची खूप जुने नाते आहे. त्याचे वडील सुनील दत्त हे मनमोहन सिंह सरकारमध्ये मंत्री होते. तसेच बहीण प्रिया दत्तदेखील राजकारणात होती. त्यामुळे संजयदेखील राजकारणात येईल अशी शक्यता वर्तवली गेली. पण यावर अभिनेत्याने स्वतःच सर्व शंका दूर केल्या आहेत.
संजयच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो लवकरच एक हॉरर कॉमेडी चित्रपट ‘द वर्जिन ट्री’ व ‘वेलकम टू द जंगल’मध्ये दिसणार आहेत. ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अक्षय कुमार, अर्शद वारसी, सुनील शेट्टी, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी असे अनेक कलाकार दिसणार आहेत. सर्वच जण या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.