Bollywood Actor Saif Ali Khan Attacked At Home : बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री राहत्या घरी एका चोराने धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बातमीने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. रात्री अडीच वाजता हा प्रकार घडल्याचे समजते. सैफ अली खान याच्या घरात घुसून एका अज्ञाताने हा हल्ला केल्याचे म्हटले जाते. गेले काही दिवस तो चोर सैफ अली खानच्या घराची टेहाळणी करत होता. चोरीच्या उद्देशाने तो अज्ञात व्यक्ती अभिनेत्याच्या घरात शिरला होता. सैफ रात्री झोपला असताना अचानक आवाज झाला आणि दोघे एकमेकांसमोर आले. त्याचवेळी चोराने सैफवर चाकूने वार केले. (supriya sule on saif ali khan attack)
या घटनेची माहिती समोर आली तेव्हा खासदार सुप्रिया सुळे या पुण्यातील एका कार्यक्रमात होत्या. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सैफच्या कुटुंबीयांना फोन केला. सुप्रिया सुळे सैफच्या कुटुंबियांशी फोनवर बोलत असतानाचा संवाद ‘एबीपी माझा’च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फोनवरील व्यक्ती नेमकी कोण होती, हे समजू शकलेली नाही. मात्र, ही व्यक्ती करिना कपूरची बहीण करिश्मा कपूर असावी, असा अंदाज आहे. सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले की, “बेबो आणि सैफला सांग मी फोन केला होता. काय होत आहे, ते मला सांगत राहा. काळजी घ्या”, असे सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर
यापुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सैफ अली खान यांच्या कुटुंबाशी मी संवाद साधला. मात्र त्यांची प्रायव्हसी ही महत्त्वाची आहे. काही वेळातच त्यांच्याकडून आणि पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात येईल. सैफ अली खान सुरक्षित आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या कुटुंबाकडून याबाबत अधिकृतरित्या माहिती येईल यांची आपण वाट बघू. हल्ला कसा झाला? काय घडलं मला माहीत नाही. ही घटना चिंता वाटणारीच आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ द्या, त्यानंतर काय प्रतिक्रिया द्यायची? गृहमंत्र्यांशी बोलायचं का? हे मी ठरवेन”.
आणखी वाचा – धक्कादायक! सैफ अली खानवर चाकू हल्ला, घरात घुसून ज्ञातांकडून अनेकदा वार, रुग्णालयात उपचार सुरु
दरम्यान, या हल्ल्यानंतर सैफ अली खानला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.तसेच पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपास सुरु आहे.पोलिसांनी या प्रकरणात सैफच्या घरातले सीसीटीव्ही ताब्यात घेऊन तपासायला सुरुवात केली आहे. त्यासोबत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.या तिघांची चौकशी सूरू आहे.