बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा आता खूप चर्चेत आहे. एका अज्ञात व्यक्तीने सैफच्या घरी घुसून चाकूने हल्ला केला आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. सैफच्या घरी एकदम कडक सुरक्षा असलेली बघायला मिळते. मात्र असे असतानाही त्याच्यावर हल्ला कसा झाला? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. सैफ त्याच्या व मुलांच्या सुरक्षिततेची नेहमी काळजी घेत असतो. त्यामुळे इमारतीला असलेल्या सुरक्षेव्यतिरिक्त त्याची वैयक्तिक सुरक्षादेखील कडक असते. अशातच आता सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षारक्षकाचा पहिला जबाब समोर आला आहे. ही घटना घडली तेव्हा नक्की काय घडलं? याबद्दल त्याने सांगितले आहे. (Bollywood Actor Saif Ali Khan Attacked At Home)
समोर आलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या खाली तीन सुरक्षारक्षक तैनात होते. त्यानंतर एका सुरक्षारक्षकाने जबाब देताना सांगितले की, “माझी आता सकाळची ड्यूटी असते. जी माहिती आहे ती रात्री असणाऱ्या सुरक्षारक्षकांकडून मिळेल”. सैफच्या इमारतीखाली दोन शिफ्टमध्ये सुरक्षारक्षक काम करतात. एका वेळी तीन ते चार सुरक्षारक्षक उपस्थित असतात. सैफवर हा हल्ला सकाळी तीन वाजताच्या सुमारास झाला. त्यामुळे आता रात्रपाळी करणाऱ्या सुरक्षारक्षकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान आता इमारतीच्या सर्व सुरक्षारक्षकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. जेव्हा हल्ला करणारी व्यक्ती सैफच्या घरी पोहोचली तेव्हा तिथे काम करणाऱ्या बाईने त्याला पकडले. त्यानंतर त्यांच्यामध्ये मारामारी झाली. सैफला आवाज आला तेव्हा तेव्हा लगेच तो त्या ठिकाणी पोहोचला. त्यावेळी सैफने शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्या हल्लेखोराने सैफवर चाकूने वार केले आणि पळून गेला.
मात्र या सगळ्या प्रकारानंतर त्या व्यक्तीला घरात घुसण्याची परवानगी कोणी दिली? हा प्रश्न उपस्थित राहतो. कारण परवानगीशिवाय घरात कोणीही प्रवेश शकत नाही. दरम्यान अभिनेत्यावर उपचार सुरू आहेत. लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितले की, सैफ अली खानला त्याच्या वांद्रे येथील घरी अज्ञात व्यक्तीने भोसकले आणि त्याला पहाटे 3.30 वाजता आणण्यात आले. उत्तमनी यांनी सांगितले की, सैफला सहा जखमा आहेत. यापैकी एक पाठीच्या कण्याजवळ आहे. सध्या अभिनेत्यावर उपचार सुरु आहेत.